Opinion

पुन्हा उभा राहिला चाफेकर बंधूंचा वाडा.

चिंचवड, पुणे येथील चाफेकर कुटुंबातील तीन तरुणांनी स्वातंत्र्य संग्रमात स्वताची आहुती दिली. त्यांचा जुना वाडा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दिमाखाने उभा होता. सन १९४८ मधील जळितात भस्मसात तो झाला. आगीतून वाचलेले वाड्याचे लाकूड घरोघरी लोकांनी सरपण म्हणून नेले. भिंतींची माती घरे लिंपण्यास, चुली सारवण्यासाठी लोक घेऊन गेले. वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीची कचराकुंडी झाली आणि ती चक्क बुजवली गेली. वाड्याच्या जागेवर दारूचे गुत्ते चालू लागले. कित्येक वर्षे त्याठिकाणी दारूचे गुत्ते चालू होते. ज्या ठिकाणी क्रांतिवीर जन्माला आले त्या ठिकाणी दारू पिऊन लोक झिंगू लागले. गावातील लोकांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती. पण हे सारे बंद करण्याचे धाडस दाखवणारा एकही वीर पुढे येत नव्हता. एक दिवस काही मंडळींनी एकत्र येऊन सन १९९५-९६ च्या दरम्यान उठाव केला. मारामाऱ्या झाल्या आणि दारूच्या गुत्याची त्या जागेवरून हकालपट्टी झाली.

क्रांतिवीर चापेकर बंधूंचा वाडा पुन्हा जसाच्या तसा उभा करण्याचा विचार आणि निर्धार झाला. त्यासाठी स्थानिक मान्यवरांची समिती निर्माण झाली. गिरीश प्रभुणे, डॉ. वैद्य, दत्ता दातार, कांता जाधव, अश्विनी मोकाशी अशा अनेक मंडळीनी चापेकरवाडा पुन्हा पूर्ववत उभा करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला हजारो हात पुढे आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा ठराव करून या पवित्र कार्यासाठी अनुदान मंजूर केले.
दि. २२ जून १९९७ रोजी चापेकर बंधूंच्या हौतात्म्याच्या शताब्दीदिनी कामास प्रारंभ झाला. जुन्या जाणत्या लोकांच्या मुलाखतीवरून वाड्याचा रचना आलेख वास्तुरचनाकार संजू फणसळकर यांनी तयार केला.

काम महानगरपालिकेने टेंडरद्वारे एका ठेकेदाराला दिले. कामास प्रारंभ झाला. पाया भरला गेला. परंतु पुढील कामाचे क्लिष्ट व मोठे स्वरूप पाहून ठेकेदाराने काढता पाय घेतला. काम ठप्प झाले. त्यानंतर हे काम करण्यास कोणीही धजावत नव्हता. जुना वाडा, त्याचे जुने स्वरूप विशेषतः लाकडी काम त्यासाठी लागणारे किमती लाकूड, विशिष्ट प्रकारची तक्तपोशी, मेघडंबरी त्यावरील नक्षीकाम हे सारे पुन्हा तयार करावयाचे या गोष्टी अत्यंत जिकिरीच्या प्रचंड खर्चाच्या आणि कमीत कमी लाभाच्या होत्या. दगडाचे आणि विटांचे काम ही तितकेच बारकाव्याचे आणि प्रमाणबद्धतेचे होते. विहीरही पुन्हा उभी करावयाची होती. सारे काही अवघड होते. राष्ट्रीय प्रेरणेनेच कोणी पुढे आला तरच हे काम पुरे होणार होते.
हे आवाहन पुण्यातील स्थपती नंदकिशोर एकबोटे यांनी स्वीकारले. त्यांनी फायद्याचा काही विचार केला नाही. चिंचवड येथील प्रसिद्ध दैवत गजानन व संत मोरया गोसावी यांचा आशीर्वाद घेऊन सन २००४ मध्ये नव्याने कामाला सुरुवात केली. हिरालाल व गणेश हे दोन सुतार व रोकडे नावाचा पाथरवट चालू असलेले काम पाहण्यासाठी आले. आणि हे काम करण्याचे त्यांनी अतिशय आनंदाने स्वीकारले.

वाडा पुन्हा उभा करण्यासाठी जुने सागवानी लाकूड मिळवून त्याचे योग्य त्या मापाचे दरवाजे तुळया, खांब, कडीपाट इ.गोष्टी तयार करण्यासाठी स्वतंत्र मशिनरी खरेदी केली आणि जागेवरच लाकडांची कापणी करून सुताराकडून सर्व गोष्टी जशाच्या तशा बनवून घेतल्या. नेवासा या गावावरून दगड मागविला. व तेथील काही पाथरवटास बोलावण्यात आले. त्यांच्याकडून चौकातील दगडकाम, तुळशीवृंदावन, जोते, तळखडे, दगडी पायऱ्या अशी ही दगडी कामे अतिशय कष्टाची, बुद्धीची आणि नेटाची होती.

सज्जावरील मेघडंबरी तयार करणे व ती बसविणे, त्यावरील कोरीव कामास उठावदारपणा आणणे, कडीपाटास सुबक आकार देणे, तुळई आणि खांब यामधील ब्रॅकेट्स तयार करून बसविणे, हे सारे काम फारच जिकिरीचे होते. जाड खांबावर फळ्यांचे अस्तर देऊन त्यांची जाडी प्रमाणबद्ध ठेवून त्यावर तुळया व मध्ये कडीपाट बसविणे ते साधे दिसले तरी कौशल्याचे काम होते.

लहान आकाराच्या चपट्या विटा बाजारात उपलब्ध नव्हत्या म्हणून ठराविक आकाराच्या विटा तयार करण्यासाठी वीटभट्टी सुद्धा जागेवरच लावण्यात आली होती. छपरासाठी लागणारी गोल नळीची कौले कोठेच मिळत नव्हती. हे सर्व साहित्य वीटभट्टीतून तयार करण्यात आले. वीटकाम इतके सुबक तयार करण्यात आले की विटांचे सांधे एकमेकांस बरोबर जुळवून अशा पद्धतीने बसविण्यात आले की त्यातील सिमेंट कोठेही दिसत नाही. दर्शनी भिंतींचा रंग पिवळ्या मातीसारखा दिसणे गरजेचे होते. ही रंगसंगती साधण्यासाठी रंगांचे विविध नमुने आणून त्यांची मिश्रणे तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली.

चौक, सोपे, आतील दालने, चौकातील वृंदावन, चौकात पूर्ण दगडी फरशी, अत्यंत रेखीव जोती, जोत्यांना ठिकठिकाणी बसवलेल्या कड्या, चाफेकरांनी दुधासाठी पाळलेल्या गाई-म्हशी बांधण्यासाठीचा गोठा, सज्जा, सज्जा वरील मेघडंबरी, दरवाजा, बाजूच्या देवड्या, आतील पायऱ्या असा तीनमजली वाडा अवघ्या काही महिन्यांत उभा राहिला.
चिंचवड गावात रामआळीत पूर्वाभिमुखी हा वाडा उभा आहे. वाड्यासमोरून उत्तर-दक्षिण असा गावचा हमरस्ता आहे. वाड्याच्या समोर उभे राहिल्यावर दरवाजावरील गणेशपट्टी आणि वरील मेघडंबरीयुक्त सज्जा पाहून मन प्रसन्न होते.

वाड्याच्या आत प्रवेश केल्यावर दगडी फरशीचा चौक मधोमध असलेले तुळशीवृंदावन, चार सोपे, त्यावरील दोन मजले, सुंदर असे लाकूडकाम पाहिल्यावर खरोखरच चापेकरांचा हा वाडा नवा असला तरी जुन्या घटनांनी मात्र त्या काळातच घेऊन जातो. त्यांची त्या वेळची पितळी भांडी एका फडताळात ठेवलेली दिसतात. तर बाहेरच्या सोप्यात देव्हाऱ्यातील त्यांच्या पूजेच्या देवाचे दर्शन घडते. समोरच्या सोप्यात क्रांतिवीर दामोदर चापेकर यांचा पुतळा पाहिल्यावर क्रांतिदिन मनःचक्षू पुढे साक्षात उभा राहतो. वाड्याचे तिन्ही मजले पाहिल्यावर परसातील विहीर पाहून नव्या उभ्या राहिलेल्या वाड्याचे मंगलमय प्रतिबिंब विहिरीतील पाण्यात दिसू लागते आणि त्याचक्षणी चापेकर बंधूंचा ब्रिटिशांच्या दडपशाही आणि अत्याचार यांच्या विरुद्ध दिलेला लढा आणि त्यातून प्राप्त झालेले वीरमरण याचा ज्वलंत इतिहास उभा राहतो
महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील वाड्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी “आपले छंद’ आठवणीतील वाडे” या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा वाड्याविषयी माहिती जगभर पोहचवा.
संदर्भ :- वाडा या पुस्तकातून
लेखक : विलास भि. कोळी
फोन नं :- 97630 84499

Back to top button