FoodsHealth and WellnessLife StyleNews

2023 :- International millet year

संयुक्त राष्ट्राकडून आगामी २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ (International year of millets 2023 ) म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

पोषण देणाऱ्या ‘मिलेट’ वा भरड धान्यांपासून मिळणारे आरोग्यसंबंधीचे फायदे खूप असल्याने त्याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.

भविष्यात धान्याचा तुटवडा पडू नये म्हणून जगभरातच भरड धान्यांचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येणार

‘सुपर फूड्स’ अशी ओळख असलेल्या भरड धान्यांच्या बाबतीत भारत हा जगातला अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो.भारताला भरड धान्यांचे जागतिक केंद्र म्हणून पुढे येण्याची अनुपम संधी प्राप्त झाली आहे,त्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध पावले उचलत आहे.

कोविडनंतर समाजात पोषक आहाराबद्दल जिज्ञासा निर्माण होताना दिसून येत आहे.भारतीय ग्राहक हा नेहमी स्वस्त-सुंदर -टिकाऊ मालाला आपली पसंती दर्शवतो,मिलेट्स देखील पौष्टिक आणि परवडेबल आहेत.याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित केले. हे वर्ष घोषित करण्यामागे भारत सरकारची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. या संदर्भात भारत सरकारने पुढाकार घेऊन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मंजूरही करण्यात आला होता. त्यासाठी ७०पेक्षा जास्त देशांनी पाठिंबा दर्शविला.

हरित क्रांतीनंतर गहू आणि तांदळाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली, पण भरड धान्य मात्र नव्या जीवनशैलीत नाहीसे झाले. या पार्श्वभूमीवर भारत सरकार पौष्टिक भरड धान्ये पुन्हा जनतेच्या आहारात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.भरड धान्यांचे महत्त्व, शाश्वत शेतीमध्ये भरड धान्यांची भूमिका, तसेच स्मार्ट आणि सुपर फूड म्हणून भरड धान्यांचे फायदे याबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यात भारत सरकारने उचलले हे पाऊल स्वागतार्ह आहे.

भरड धान्यांचा प्राचीन वारसा भरड धान्य पिकांना पुरातन धान्य म्हटले जाते. कारण भारतीय उपखंडात सुमारे ५००० वर्षांपासून ती उपलब्ध आहेत.हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृतीमध्ये अन्न म्हणून भरड धान्यांचा वापर केला जात होता.भरड धान्ये उपयुक्त पोषक घटकांनी समृद्ध असल्याने त्यांना ‘सुपर फूड’ असेही संबोधले जाते. ‘भरड धान्य’, ‘देवधान्य’ किंवा ‘श्रीधान्य’ असेही म्हटले जाते.

सर्वसामान्यत: Major म्हणजेच ‘मोठे मिलेट’ आणि Minor म्हणजेच ‘धाकटे मिलेट’ अशा दोन भागात मिलेटची वर्गवारी केली जाते. मोठ्या मिलेटमध्ये ज्वारी, बाजरी, तर छोट्यामध्ये नाचणी, वरई, राळा, सावा, कोदो/हरिक, बर्टी, ब्राउन टॉप मिलेट येतात..

भरड धान्ये – पोषणमूल्यांचा खजिना आणि विविधता आपल्या देशात व राज्यात भरड धान्य पिकांची विविधता आढळते. ज्वारी, बाजरी, वरई, राळा, कोद्रा, बोर्टी ही सर्व भरड धान्ये शरीरास उपयुक्त आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या विविध आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रोजच्या आहारात ‘भरड धान्यांचा’ समावेश असणे आवश्यक आहे.आपल्याकडे भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर ही भरड धान्ये वापरली जातात.

ज्वारी‘ हे भरड धान्यांपैकी महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात ज्वारीला ‘जोंधळा‘ असेही म्हटले जाते.

डोंगराळ, उताराच्या जागेवर, निकृष्ट मातीतसुद्धा कोणत्याही खते आणि औषधीशिवाय, वातावरणातील बदलास तग धरून येणारी ही भरड धान्य पिके म्हणजे अन्न आणि पोषण सुरक्षा साध्य करण्यासाठी वरदान आहेत. जगभरात तसेच भारतात मिलेट जागरूकतेवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे.आहारात मिलेटचा समावेश आज वाढताना दिसतो आहे.

जनावरांच्या चाऱ्याची सोय – या धान्यांच्या काडय़ांचा, कडब्याचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो. त्यामुळे सर्वार्थाने यांचा उपयोग करता येऊ शकतो.

शेतकऱ्यांच्या उपजीविकेची सुरक्षा – हलक्या व कोरडवाहू जमिनीत, मुबलक पाण्याची सोय नसली तरी या पिकांचे चांगले उत्पन्न मिळते. कोणत्याही हवामानात यांचे पीक येते. तसेच याबरोबर शेतकरी कडधान्य, तेलबिया, भाजीपाला अशीही पिके काढू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना उपजीविकेची शाश्वतता ही धान्ये मिळवून देतात.

पर्यावरणीय समतोल – ज्या शेतात मिलेट पिकवले जाते तेथील जमिनीतील नत्रांचे प्रमाण वाढून जमिनीचा कस वाढतो. पीक विविधता जपली जाते, जमिनीचा ऱ्हास थांबतो.पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखला जाण्यास मदतच होते.

भारत भरड धान्यांचे जागतिक केंद्र आज भारतीय शेती उत्पादने जगाच्या कानाकोपऱ्यात, नव्या बाजारपेठांत पोहोचत आहे. भारताचे भरड धान्य उत्पादनातील स्थानही अढळ आहे. भरड धान्य पिक प्रामुख्याने कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश,राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये घेतली जातात.अन्न आणि कृषी संस्थेच्या आकडेवारीनुसार भारतात भरड धान्य पिकांच्या लागवडीखाली सुमारे ११८ लाख हेक्टर क्षेत्र आहे.

जगाच्या ४१ टक्के भरड धान्यांचे उत्पादन भारतात होते. २०२१-२२ हंगामात भारतात भरड धान्यांची १७० लाख टनांपेक्षा जास्त उत्पादनांची निर्मिती झाली आहे. भरड धान्याचे आशिया खंडातील ८०% जास्त उत्पादन भारतात घेतले जात आहे. विशेष म्हणजे, भारत सर्व प्रकारच्या भरड धान्याचे उत्पादन करतो. ही सर्व बलस्थाने लक्षात घेता आपला देश भरड धान्यांचे जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त भरड धान्य लागवड, प्रक्रिया, डिस्ट्रिब्युशन आणि निर्यातीच्या दृष्टीने केंद्र सरकार ठोस पावले उचलताना दिसत आहे. कृषी कल्याण विभाग आणि नाफेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे.देशात भरड धान्यांसाठी तीन केंद्रे स्थापन केली आहेत.हरियाणा येथील चौधरी चरणसिंग कृषी विद्यापीठात केंद्र सरकारच्या वतीने बाजरीसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली आहे.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स, हैदराबाद येथे ज्वारीसाठी केंद्र उभारण्यात आले आहे.इतर लहान भरड धान्यांसाठी, बंगळुरू येथील कृषी विद्यापीठात एक केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान’ अंतर्गत १४ राज्यांमधल्या २१२ भरड धान्य जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना उत्तम बियाणे वितरणाचा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत देशातील २७ भरड धान्य उत्पादक जिल्हे निश्चित करण्यात आले आहेत. देशात ज्वारी व इतर भरड धान्य उत्पादन करणाऱ्या सुमारे १८० शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत.येत्या काळात या कंपन्याच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे, हे लक्षात घेऊन देशात भरड धान्ये क्षेत्र विकसित करण्यावर सरकारचा भर आहे.भरड धान्यांवर देशातील सर्व भागात क्लस्टर निर्मिती झाल्यास दुष्काळी व दुर्गम भागातील नव उद्योजक, शेतकरी यांना शेतीपूरक तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणार आहे.

स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात आपण आत्मनिर्भरतेकडे आगेकूच करत आहोत. स्वावलंबी असणे निश्चितच एखाद्या देशाच्या विकासासाठी व अभिमानाची गोष्ट आहे.आपण भारतातच प्रत्येक प्रकारच्या वस्तू किंवा सामग्रीचे उत्पादन स्वतःच करू शकतो. यासाठी आपल्याला इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहण्याची गरज नाही.

एक काळ असाही आपण बघितला आहे की, अन्न धान्यासाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावे लागत होते.डुकरे देखील खाणार नाहीत असा “तांबडा गहू” (milo wheat) अमेरिकेने आपल्याला पाठवला होता. तो एक दिवस होता आणि आजचा दिवस आहे, ज्यावेळी भारत १०६ देशांना धान्य निर्यात करत आहे. कधीकाळी ज्यांनी आम्हाला तुच्छ समजले त्यांना ही समर्थ भारताची जोरदार चपराक आहे.

शेवटी इतकच म्हणू इच्छितो :- Glorious days are yet to come…

https://www.mygov.in/campaigns/millets/

Back to top button