बुद्ध पौर्णिमा ….
गौतम बुद्धांचे (gautam buddha purnima) मुळ नाव सिद्धार्थ. त्यांचा जन्म इसवीसन पूर्व 563 साली कपिलवस्तु जवळ लुंबीनी येथे झाला. आत्ता हे स्थान नेपाळ येथे आहे. कपिलवस्तू ही शाक्य जनपदची राजधानी होती. शाक्य जनपद हे कोसल राज्याला अधीन असलेले एक गणराज्य होते.
सिद्धार्थ हे शाक्यवंशीय क्षत्रिय राजपुत्र होते. त्यांचे गोत्र गौतम असल्याने त्याच्या नावाच्या अगोदर गौतम ही उपाधी लागली.
त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन व आईचे नाव महामाया होते. ती कोळी वंशीय होती. गौतमाच्या जन्मानंतर ७ दिवसांनी तिचा मृत्यु झाला. त्यानंतर महामाया ची बहिण महाप्रजापती गौतमी जी शुद्धोधन राजाची दुसरी बायको होती तिने गौतमाचा सांभाळ केला. वयाच्या ८ व्या वर्षापासुन त्याचे अध्ययन सुरु झाले.
पहिल्यांदा ज्याने गौतमाची भविष्य वाणी केली होती त्या ब्राह्मणा कडे सुरु झाले.नंतर आचार्य सब्बमित्र यांच्याकडे वेद,उपनिषद आणि तत्कालीन दर्शन शिकला. तद्नंतर तो क्षत्रियाला लागणारी अस्त्र-शस्त्रविद्या शिकला. गणित व संगीताचे ज्ञान ग्रहण केले.
नंतर अलार कालाम यांच्याकडे योग, चित्त एकाग्रता आणि समाधीमार्ग शिकला.
गौतमचे आयुष्य भरपूर सुखात चालले होते. वयाच्या 16 व्या वर्षी आपल्या मामाच्या मुलीशी म्हणजे कोळी राजा दंडपाणि याच्या “यशोधरा” नावाच्या मुलीशी झाला. त्यानंतर काही वर्षात त्यांना पुत्र झाला ज्याचे नाव “राहुल” ठेवण्यात आले.
सिद्धार्थ च्या आयुष्यात परिवर्तन आले जेंव्हा त्याने एक रोगी माणूस , एक वृद्ध माणूस , एक मृत्यु झालेला माणूस तसेच एक सन्यासी बघितले.
शाक्य जनपद व कोळी जनपद यांच्या मधून एक नदी वहायची. तिच्या वापरा संबंधी दोन्ही जनपद मध्ये विवाद निर्माण झाला व युद्धास सज्ज झाले. दोन्ही गटातील लोक बहु मनाने युद्धास तयार होते. पण गौतम त्या युद्धाच्या विरुद्ध होता. शाक्य संघाच्या विरुद्ध हे मत होते व त्यामुळे गौतमाचे सारे कुटुंब दंडित होऊ शकत होते. त्या कारणाने सारा परिवार दंडित न होऊ देता स्वतः आपल्या राज्याचा त्याग करण्याची शिक्षा भोगण्यास तयार झाला.आपल्या पिता माता व पत्नीची परवानगी घेऊन गौतम बाहेर पडला.
कपिलवस्तू येथील भारद्वाज आश्रमातून सन्यासी होण्याची दीक्षा घेतली व गौतम मगध राज्याची राजधानी राजगृह येथे पोहोचला. राजगृहातील प्रवासाच्या दरम्यान इतर पाच सन्यासी भेटले. त्या सन्यासींनी गौतमास सांगितले की कोळी व शाक्य यांच्यातील विवाद आत्ता संपला आहे तेंव्हा तु घरी परत जा.पण सिद्धार्थ ने सांगितले की माणसाला होणारे कष्ट व दुःखाचे कारण जाणुन त्याचे निदान शोधल्याशिवाय मला जाता येणार नाही. त्याद्वारे लोकांचे कल्याण व्हायचे आहे.
सिद्धार्थ प्राथम भृगु ऋषी च्या आश्रमात गेला नंतर आलार कालाम यांच्या कडे राहिला. नंतर कोसल राज्यातील प्रख्यात योगाचार्य रामपुत्त यांचे शिष्यत्व पत्करले. पण त्या ज्ञानाने सिद्धार्थ चे समाधान झाले नाही. शरीराला कष्ट देऊन साधना करणे. ध्यान साधना करणे. श्वास नियंत्रित करून ध्यान लावणे तसेच ध्यानाचे विविध प्रकार सिद्धार्थ शिकला. पण ध्येय प्राप्ति काही होत नव्हती. शेवटी तपसाधना करण्याचे ठरवून तो गया येथील नैरंजना नदीकाठी उरबेला गावात तपश्चर्या साठी बसला. त्याच्या बरोबर ते पाच सन्यासी देखील होते.
सहा महिने घोर तपश्चर्या केली. फक्त कंद मुळे फळ नी झाडाची साल एवढच ग्रहण करत असे. त्याने तो एवढा कृश झाला की पोट पाठीला लागले. पण एवढे कष्ट घेऊन हवे ते साध्य झाले नाही. मृतपाय पडलेल्या अवस्थेत तो झाडा खाली पडुन होता. तेवढ्यात सुजाता नावाची मुलगी वनदेवाला प्रसाद दाखवण्यासाठी खीर घेऊन आली व तिने ती खीर श्रद्धापूर्वक निपचित पडलेल्या सन्यासाला अर्पण केली. ती खाऊन त्याने तपस्या समाप्त केली. ते पाहुन ते पाच सन्यासी रागावून सिद्धार्थला सोडुन निघुन गेले.
सिद्धार्थ उरबेला गावातून गया ह्या ठिकाणी आला. व पिंपळाच्या झाडा खाली आपल्या मूळ समस्या विषयी चिंतन करण्यासाठी ध्यान लावुन बसला.समस्या हीच होती की माणसाच्या दुःखाचे कारण काय? व त्याचे निवारण करण्याचा मार्ग कोणता?.
चार आठवडे तो ध्यान मग्न होता आणि वैशाख पौर्णिमेच्या रात्री त्याला सम्यक ज्ञान व सम्यक मार्ग द्वारे त्याला त्याचे उत्तर मिळाले. आणि गौतम, बुद्ध झाला व ज्या पिंपळाच्या वृक्षा खाली बसला होता त्यास बोधिवृक्ष म्हणुन ओळखू जाऊ लागले
धम्म च्या भाषेत सम्यक ज्ञानाचा शोध घेणार्याला बोधिसत्व म्हणतात तर सम्यक ज्ञान प्राप्त झालेल्याला बुद्ध म्हणतात.
गौतम बुद्ध चातुर्वर्ण्य तसेच पुनर्जन्म या संज्ञेच्या विरुद्ध होते. वेदां मधील ज्ञान त्यांना मान्य नव्हते. त्यांचा अनुभुती कींवा आलेल्या प्रत्यक्ष अनुभवावर जास्त विश्वास होता. मिळालेल्या ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी त्यांनी त्या पाच सन्यासींना त्यांनी शोधले व उपदेश केला. त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात.
गौतम बुद्धांनी चार आर्यसत्य , अष्टांगीक मार्ग, पंचशील तसेच दहा गुण ज्याला पारमिता म्हणतात ते सांगितले
चार आर्यसत्य
दुःख आहे
दुःखाचे कारण आहे
दुःखाचे निवारण आहे
दुःखाच्या निवारणाच्या उपाय आहे
अष्टांग मार्ग:-
1.सम्यक दृष्टि
2.सम्यक संकल्प
3.सम्यक वाणी
4.सम्यक कर्म
5.सम्यक आजीविका
6.सम्यक व्यायाम
7.सम्यक स्मृति
8.सम्यक समाधि
पारमित.
पारमित म्हणजे जन्म मृत्यूच्या फेर्यातुन सुटून निर्वाण अवस्थेला जाणे.
दहा पारमित….
शील ,दान ,उपेक्षा नैशक्रम्य, वीर्य , शांति, सत्य ,अधिष्ठान , करुणा , मैत्री
पंचशील:-
(१) अस्तेय (चोरी न करणे);
(२) अहिंसा (हिंसा न करणे),
(३) ब्रह्मचर्य (व्यभिचार न करणे),
(४) सत्य (खोटे न बोलणे)
(५) मादक द्रव्यांचा भोग न करणे
.
माणसाच्या मूळ दुःखाचे कारण तृष्णा आहे. व बुद्धाने सांगितलेल्या मार्गाने गेल्यास तृष्णा वर विजय मिळवून जीवन सुखी व समाधानी करता येते. धम्म हे धर्मापेक्षा सामाजिक आंदोलन जास्त होते. धम्म समता, स्वातंत्र्य , न्याय, नैतिकता,बंधुत्व, अनुभव व सत्यता याच गोष्टीवर आधारित आहे आणि कुठलंही अवडंबर नाही.
………….. नमों बुद्धाय……….
गौतम बुद्ध यांची वंदना –
“नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ।”
त्रिशरण पंचशील बुद्ध वन्दना –
त्रिशरण
बुद्धं शरणं गच्छामि ।
धम्म शरणं गच्छामि ।
संघं शरणं गच्छामि ।
दुतियम्पि बुद्धं सरणं गच्छामि ।
दुतियम्पि धम्म सरणं गच्छामि ।
दुतियम्पि संघ सरणं गच्छामि ।
ततियम्पि बुद्धं सरणं गच्छामि ।
ततियम्पि धम्म सरणं गच्छामि ।
ततियम्पि संघ सरणं गच्छामि ।
पंचशील :-
- पाणतिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि ।
- अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि ।
- कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि ।
- मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि ।
- सुरा-मेरय-मज्ज-पमादट्ठानावेरमणी सिक्खापदं समादियामि ।
॥ भवतु सर्व मंगलं ॥
साधू साधू साधू॥
लेखक :- प्रशांत आंबुर्ले
संदर्भ :-
महामानव बुद्धी और उनकी शिक्षा- डॉ रामगोपाल सिंग