भारत राष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendra modi ) रविवार, २८ मे २०२३ रोजी देशाच्या नवीन संसद भवनाचे (सेंट्रल व्हिस्टा) उद्घाटन करणार आहेत.
योगायोगाने हा दिवस स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर(savarkar) यांची १४० वी जयंती देखील आहे.
१० डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधानांनी या नवीन संसदेच्या इमारतीची पायाभरणी केली होती. ८६२ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या नवीन संसद भवनाचे काम आता पूर्ण झाले आहे.
१५ जानेवारी २०२१ रोजी नवीन संसद भवनाचे बांधकाम सुरू झाले. सेंट्रल व्हिस्टा (central vista ) प्रकल्पांतर्गत बांधलेली ही इमारत केवळ २८ महिन्यांत बांधून पूर्ण झाली आहे.
संसदेची जुनी इमारत ४७ हजार ५०० चौरस मीटरमध्ये, तर नवीन इमारत ६४ हजार ५०० चौरस मीटरमध्ये बांधण्यात आली आहे. म्हणजेच नवीन इमारत जुन्या इमारतीपेक्षा १७ हजार चौरस मीटर मोठी आहे. नवीन संसद भवन ४ मजली आहे. त्याला ३ दरवाजे आहेत, त्यांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावे आहेत. खासदार आणि व्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रवेश असणार आहे. या इमारतीवर भूकंपाचा परिणाम होणार नाही.
या नवीन संसद भवनाचे वास्तुविशारद बिमल पटेल आहेत तर सुप्रसिद्ध टाटा ग्रुपने(tata) याचे संपूर्ण बांधकाम केले आहे. नवीन संसद भवन विक्रमी वेळेत अंदाजे ६०,००० मजुरांनी मेहनतीने बांधले. त्यामुळे पंतप्रधान यावेळी या श्रमयोगींचाही प्रातिनिधिक सन्मान करणार आहेत.आधुनिक गरजा लक्षात घेऊन या वास्तूची स्थानिक परंपरांशी सांगड घालण्यात आली आहे.
दुसरीकडे, उद्घाटनापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की, नवीन संसद भवन हा आपला इतिहास, सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि सभ्यता यांना आधुनिकतेशी जोडण्याचा एक अनुपम प्रयत्न आहे. यानिमित्ताने एका ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन होत आहे. किंबहुना त्यांनी नव्या संसद भवनात “सेंगोल” बसवणार असल्याची घोषणा केली आहे.
यासह, सेंगोल आता देशाचे पवित्र राष्ट्रीय चिन्ह म्हणून देखील ओळखले जाईल. अमित शहा म्हणाले की, सत्ता हस्तांतरण म्हणजे केवळ हस्तांदोलन किंवा कोणत्याही कागदपत्रावर सही करणे असे नाही.
गृहमंत्री अमित शाह (amit shah ) पुढे म्हणाले की, ७५ वर्षांनंतर देखील आज देशातील बहुतांश नागरिकांना याबाबत माहिती देखील नाही. शाह यांनी ‘सेंगोल’ (राजदंड) हे भारतीय स्वातंत्र्याचे ‘महत्त्वाचे ऐतिहासिक’ प्रतीक आहे असे सांगितले. ‘सेंगोल’ हे ब्रिटिशांकडून भारतीयांना सत्तेच्या हस्तांतरणाचे एक महत्वपूर्ण प्रतीक म्हणून देण्यात आले. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी तामिळनाडूतुन आलेल्या सेंगोलचे स्वागत करतील आणि ते नवीन संसद भवनाच्या आत ठेवतील. सेंगोल अध्यक्ष्यांच्या आसनाजवळ ठेवण्यात येईल.
शाह यांनी असेही सांगितले की, जेव्हा पंतप्रधान मोदींना या परंपरेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी नवीन संसदेत सेंगोल बसवण्याचा निर्णय घेतला. १९४७ च्या स्वातंत्र्य हस्तांतरण सोहळ्यात जो सेंगोल (राजदंड ) पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रदान करण्यात आला होता. तो सेंगोल घडविणारे सुवर्णकार उम्मीदी एथिराजुलू ( ९६ वर्ष) तसेच उम्मीदी सुधाकर (८८ वर्ष) हे हयात असून या कार्यक्रमाला ते विशेष निमंत्रित आहेत.
सेंगोलचा इतिहास..
सेंगोल (sengol) हा तमिळ भाषेतील ‘सेम्माई‘ या शब्दापासून बनलेला शब्द आहे असे सांगितले जाते. याचा अर्थ धर्म, सत्य आणि निष्ठा. सेंगोल (राजदंड) हे भारतीय सम्राटाच्या सामर्थ्याचे आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक होते. चोल काळात, राजांच्या राज्याभिषेक समारंभात सेंगोलला अत्यंत महत्त्व होते. सेंगोल हे अधिकाराचे पवित्र प्रतीक मानले जात असे, जे एका शासकाकडून दुसऱ्या शासकाकडे हस्तांतरित केले जात असे.
चोल राजवंश वास्तुकला, कला, साहित्य आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी विलक्षण योगदानासाठी सुप्रसिद्ध आहे. चोल राजांच्या सामर्थ्याचे, सत्याचे आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेले सेंगोल हे चोल राजवटीचे प्रतिकात्मक प्रतीक म्हणून उदयास आले.
सुमारे १३०० वर्षांपूर्वी मुदुराई येथे स्थापन झालेल्या शैव मठाची पंडित नेहरूंना दिलेला तो सेंगोल ही निर्मिती आहे.सोबतच्या छायाचित्रात एका दगडात कोरलेल्या भगवान शंकराच्या हातात हुबेहूब असाच सेंगोल स्पष्टपणे दिसतो.
ज्याला सेंगोल दिले जाईल त्याने न्याय पूर्ण वागणूक (सर्वांना समान न्याय) करणे अपेक्षित आहे.
या सेंगोलचा इतिहासही पंडित जवाहरलाल नेहरूंशी (jawaharlal nehru) संबंधित आहे. एवढेच नाही तर तामिळनाडूशीही त्याचा विशेष संबंध आहे. सेंगोल हा संस्कृत शब्द “संकु” पासून आला आहे, ज्याचा अर्थ “शंख” आहे; असेही सांगितले जाते. हिंदू धर्मात शंख ही एक पवित्र वस्तू आहे आणि ती सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून वापरली जात असे. राजदंड हे भारतीय सम्राटाच्या सामर्थ्याचे आणि अधिकाराचे प्रतीक होते. हे सोन्याचे किंवा चांदीचे बनलेले तथा मौल्यवान रत्नांनी सजवलेले असे. सेंगोल (राजदंड) सम्राटाचा अधिकार दर्शविण्यासाठी वापरला जात असे. संसद भवनात ठेवल्या जाणार्या सेंगोलच्या शिखरावर नंदी विराजमान आहे.
या सेंगोलला स्वतंत्र भारतात खूप महत्त्व आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी जेव्हा भारताकडे सत्ता हस्तांतरित झाली तेव्हा ती प्रक्रिया या सेंगोलने केली होती. एक प्रकारे सेंगोल हे भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याच्या वेळी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित नेहरूंना विचारले की, सत्ता हस्तांतरणाच्या वेळी काय कार्यक्रम आयोजित केला पाहिजे? नेहरूजींनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. सी. राजगोपालाचारी (राजाजी) यांना विचारण्यात आले. राजगोपालाचारी यांनी सेंगोल प्रक्रियेबद्दल माहिती दिली.
यानंतर, तो सेंगोल तामिळनाडूतून दिल्लीत आणण्यात आला, प्रथम तो लॉर्ड माउंटबॅटन यांना देण्यात आला आणि नंतर त्यांच्याकडून हस्तांतरण म्हणून नेहरूंच्या निवासस्थानी नेण्यात आला. तिथे गंगाजलाने सेंगोलचे शुद्धीकरण करण्यात आले. त्यानंतर मंत्रोच्चारासह नेहरूंना सुपूर्द करण्यात आला. म्हणजे अतिशय पारंपरिक पद्धतीने सत्तांतराची प्रक्रिया पार पाडण्यात आली.भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी हा पवित्र सेंगोल प्राप्त झाल्याची घटना जगभरातील माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर कव्हर केली होती. भारताला हा सुवर्ण राजदंड मिळाल्यानंतर ही कलाकृती संविधान सभा सभागृहात नेण्यात आली.
दुर्दैव म्हणजे तो सेंगोल आतापर्यंत प्रयागराजमधील संग्रहालयात “नेहरू की छडी” म्हणून ठेवण्यात आला होता.
सेंगोल अर्थात राजदंडाचा पहिला ज्ञात वापर मौर्य साम्राज्याने केला होता. मौर्य सम्राटांनी त्यांच्या विशाल साम्राज्यावरील अधिकाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राजदंडाचा वापर केला. त्यानंतर सेंगोलचा (राजदंड) वापर गुप्त साम्राज्य, चोल साम्राज्य,चेर साम्राज्य ,पांड्य साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्याने देखील केला होता. सेंगोल (राजदंड) मुघल साम्राज्याने देखील वापरला होता. मुघल सम्राटांनी त्यांच्या विशाल साम्राज्यावरील त्यांच्या अधिकाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सेंगोलचा (राजदंड) वापर केला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावरील अधिकाराचे प्रतीक म्हणून देखील सेंगोल (राजदंड) वापरला होता.
परंपरेनुसार, सेंगोलला “राजदंड” म्हणतात. जे राजपुरोहित राजाला देत असत. वैदिक परंपरेत अधिकाराचे दोन प्रकार आहेत. राजेशाहीसाठी “राजदंड” आणि धार्मिक अधिकारासाठी “धर्मदंड”. राजदंड राजाकडे होता आणि धर्मदंड राजपुरोहिताकडे असे.सेंगोल हा सर्वकालीन अत्यंत आदरणीय राहिला आहे आणि त्याला सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. हे वारसा आणि परंपरेचे प्रतीक म्हणून आदरणीय आहे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि महत्त्वपूर्ण उत्सवांचा अविभाज्य भाग म्हणून सेंगोल वापरला जात असे.
नवीन संसद भवनाचे उद्घाटन आणि सेंगोलची स्थापना याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता भारत राष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणून पाहिले पाहिजे. या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
भारतीय परंपरा, संस्कृती आणि संविधानाने प्रस्थापित झालेली लोकशाही पुढच्या पिढीकडे सुपूर्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे हाच या सेंगोल प्रदान सोहळ्याचा १४० कोटी भारतीयांना संदेश आहे.