शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती म्हणजेच सार्वभौम राजा होणे ही हिंदुस्थानच्या इतिहासातील विलक्षण घटना होती.
इंद्रप्रस्थ (दिल्ली), कर्णावती, देवगिरी, उज्जैन, विजयनगर ही हिंदू साम्राज्ये लयाला गेल्यानंतर काही शतके हिंदुस्थानात कोणतेही सार्वभौम हिंदू साम्राज्य शिल्लक राहिले नव्हते. अनेक हिंदू राजांना मुघलांचे अथवा स्थानिक मुस्लिम राज्यकर्त्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले होते. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःस हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विधिवत राज्याभिषेक करून सार्वभौम शक्तिशाली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणूनच तो राज्याभिषेक दिवस सर्व हिंदू बांधवांसाठी एक गौरवशाली क्षण होता.
एक सार्वभौम राजा म्हणून इतर राजे अथवा शासनकर्त्यांशी करावे लागणारे तह, करार, तसेच आपल्या राज्यात दिलेली इनामे, नेमणूकपत्रे, वतने यांना अधिकृतपणा येण्यासाठी शिवाजी महाराजांना स्वतःस राज्याभिषेक करून घेणे तांत्रिक दृष्ट्या आवश्यक होते.
राज्याभिषेक हा त्या राज्याचा आणि प्रजेचा एक श्रद्धा, स्वाभिमान, अस्मिता प्रगट करणारा सोहळा असतो तसाच तो एक आनंदसोहळाही असतो. हिंदवी स्वराज्यातील सर्व प्रजा आणि शासनव्यवस्था शिवरायांच्या या राज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला लागली.
हिंदवी स्वराज्याची नवी राजधानी म्हणून शिवरायांनी किल्ले रायगडाची निवड केली होती. सुसज्ज, परिपूर्ण आणि सुरक्षित राजधानीसाठी रायगडावर यथायोग्य बांधकामे करण्याची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांनी सार्थपणाने पार पाडली होती. भव्य राजसभा, अष्टप्रधानांची कार्यालये व निवासगृहे, अठरा कारखान्यांच्या इमारती, शिवरायांचा राजवाडा, राणीमहाल, भव्य नगारखाना, धान्यकोठार, शस्त्रागार, खजिना, कोषागार इत्यादी इमारती उभारण्यात आल्या होत्या. वाडेश्वर (जगदीश्वर), शिरकाई देवी, कुशावर्त इत्यादी देवतांची देवळे, गंगासागर, कुशावर्त, हत्ती तलावासारखे अनेक तलाव आणि टाकी बांधून पाण्याची विपुलता निर्माण करण्यात आली होती. सुरक्षिततेसाठी अनेक दरवाजे, बुरुज, तटबंदी यांची भक्कम बांधणी करून रायगड अभेद्य करण्यात आला होता. रायगड हे राजधानीचे ठिकाण म्हणून तेथे एक सुसज्ज बाजारपेठही वसविण्यात आली होती. अशा पद्धतीने एका सार्वभौम राजाची राजधानी म्हणून रायगड सुसज्ज झाला होता.
तत्कालीन हिंदुस्थानातील महान, विद्वान पंडित गागाभट्ट यांच्यासह अनेक विद्वान पंडित यानिमित्ताने रायगडावर एकत्र जमले. स्वराज्याच्या अष्टप्रधानांसह सर्व प्रमुख सरदार, मनसबदार, रायगडावर एकत्र आले होते. स्वराज्यातील अनेक साधुसंत, सत्पुरुष तसेच अनेक मान्यवर मंडळीदेखील आली होती. छत्रपतींचे आप्तस्वकीय आणि कुटुंबातील सर्व मंडळी रायगडावर जमली होती. हिंदुस्थानातील वेगवेगळी संस्थाने, राजघराणी आणि इंग्रजांसारख्या परकीय राजकीय सत्तांचे प्रतिनिधी यानिमित्ताने शिवाजी महाराजांना अभिवादन करून नजराणे बहाल करणे व त्यायोगे त्यांची मर्जी संपादन करणे यासाठी रायगडावर उपस्थित झाले होते.
राज्याभिषेकापुर्वी महाराजांनी राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळे, देवदेवता, साधुसंत, सत्पुरुष यांचा आपल्याला आणि राज्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून मोठा दानधर्म केला. त्यामध्ये प्रतापगडच्या भवानीमातेस सव्वा मण सोन्याचे छत्र अर्पण केले.
शिवरायांच्या या राज्याभिषेक सोहळ्याचे पौरोहित्य करणारे विद्वान पंडित गागाभट्ट यांनी त्यानिमित्ताने ‘राज्याभिषेकप्रयोग’ या ग्रंथाची निर्मिती केली. त्यांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६, विक्रम संवत्सरे १७२९ हा शुभदिन ठरविला. त्या दिवशी इंग्रजी तारीख ६ जून १६७४ होती. या दिवसाच्या एक आठवडा अगोदरच वेगवेगळ्या धार्मिक विधींना सुरुवात झाली. त्यामध्ये गणेशपूजन, शिवाजी महाराजांची मुंज, तुलादान, सोयराबाईंशी समंत्रक विवाह, कलश संस्थापन, पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, ग्रहयज्ञ, नक्षत्रहोम, अग्नि प्रज्वलन इत्यादी धार्मिक विधी पार पाडण्यात आले होते.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या राज्याभिषेक मुहुर्त दिनी पहाटे मुख्य विधीला सुरुवात झाली. अभिषेकशाळेत सुवर्णमंचकावर सप्तसरितांच्या (सात पवित्र नद्यांच्या) तीर्थाने शिवरायांवर अभिषेक करण्यात आला. त्यावेळेस गागाभट्टांच्या पौरोहित्याखाली अनेक विद्वान पंडित वेदमंत्रांचा घोष करीत होते. यानंतर अनेक धार्मिक विधी करण्यात आले. नंतर शिवराय राजसभेतील मुख्य ३२ मण वजनाच्या अष्टकोनी, अष्टस्तंभी, मेघडंबरीयुक्त, मौल्यवान रत्नांनी जडविलेल्या सुवर्णसिंहासनावर स्थानापन्न झाले. शिवरायांच्या खांद्यावर धनुष्यबाण होते. त्यांच्या कमरेला भवानी तलवार लावलेली होती. राजमाता जिजाऊ, राणीसाहेब सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे नजिकच्या आसनांवर स्थानापन्न झाले होते. अष्टप्रधान शिवरायांच्या अष्टदिशांस राजचिन्हे घेऊन उभे होते. इतर राजचिन्हेही तिथे झळकत होती.
वेदमंत्रांच्या घोषात सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर कर्णे, सनई, चौघडे इत्यादी वाद्यांच्या निनादात अष्टप्रधानांनी शिवरायांवर सुवर्णफुले, सुवर्ण होन, रौप्य व ताम्र नाण्यांचा अभिषेक केला. भव्य राजसभेत जमलेल्या सर्व प्रमुख सरदार, मनसबदार यांच्याबरोबरच इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडन व परराज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी महाराजांना आपापले नजराणे अर्पण केले. विद्वान, पंडित कवींनी व शाहिरांनी महाराजांच्या पराक्रम आणि महान कार्यावर आधारित स्तुतिकाव्ये सादर केली. अशा पद्धतीने राजसभेतील मुख्य समारंभ पार पडला. आता भूपती, जलपती, गडपती, नरपती, गजपती, अश्वपती, पुण्यवंत, नीतीवंत, वरदवंत छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण अंबारी असलेल्या हत्तीवरून भव्य मिरवणुकीने वाजतगाजत वाडेश्वराच्या (जगदीश्वर) दर्शनाला निघाले. राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवरायांनी ‘राज्याभिषेक शक’ याची म्हणजेच नव्या कालगणनेची सुरुवात केली. शिवराई होन म्हणजेच सुवर्णनाणी सुरू केली.
साडेतीनशे वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या शिवरायांनी पराक्रमाची शर्थ करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कुशल संघटक असलेल्या शिवरायांनी सर्वसामान्य लोकांमध्ये देशप्रेम आणि धर्मप्रेम जागृत करून संघर्षासाठी आणि सर्वोच्च त्यागासाठी सिद्ध केले. त्यांच्या सहवासात आलेल्या सामान्य व्यक्तिंनी असामान्य कार्य केले. स्वराज्य निर्मितीसाठी महाराजांना परकीय, परधर्मिय, अन्यायकारी, अत्याचारी आणि शक्तिने प्रचंड असलेल्या शत्रूशी संघर्ष करावा लागला. हा संघर्ष यशस्वी करण्यासाठी त्यांनी गनिमी काव्याचा उपयोग केला. दुर्गम सह्याद्री आणि त्यातील गडकोट यांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले. त्यांनी पायदळाबरोबरच सशक्त घोडदळही निर्माण केले. महाराजांनी शक्तिशाली आरमार आणि सागरी किल्ले बांधून परकीय आक्रमणांपासून भारतीय सागरी सीमांचे रक्षण केले.
शिवाजी महाराजांनी दीनदुबळे आणि सामान्य प्रजेला सुखी करणारे सुराज्य निर्माण केले. स्वराज्यातील महिलांच्या सुरक्षिततेची त्यांनी हमी घेतली व त्यासाठी महिलांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गात कर्तव्याची जाणीव निर्माण केली. कर्तव्यात कुचराई करणारा आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला कठोर शासन केले. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा, स्वसमाज यांचा उत्कर्ष हेच उत्तुंग ध्येय आपल्या समोर ठेवून त्यासाठी अविरत कष्ट व संघर्ष करणारे ते महान राजे होते. म्हणूनच त्यांना ‘रयतेचा अथवा लोककल्याणकारी राजा’ म्हटले जाते. त्यांचे निष्कलंक चारित्र्य आणि त्यागमय आदर्श जीवन तत्कालिन समाजासाठी प्रेरणादायी ठरले होते. त्यांनी स्वराज्यातील सर्वसामान्य लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण केली.
शिवाजी महाराजांच्या पश्चात ज्यावेळेस बलाढ्य मुघल सम्राट औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस याच राष्ट्रभक्तीच्या भावनेतून मराठ्यांनी २७ वर्षे संघर्ष केला व स्वराज्याचे रक्षण केले. त्यालाच आपण ‘मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर’ म्हणतो. या स्वातंत्र्यमसराचे नेतृत्व छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी केले. याचाच परिणाम अपयशाने निराश झालेला औरंगजेब २० फेब्रुवारी १७०७ रोजी महाराष्ट्रातच मृत्यू पावला.
औरंगजेबाचे निधन हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर झाले. या कार्यात बाळाजी विश्वनाथ, खंडेराव दाभाडे, कान्होजी आंग्रे, थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, थोरले माधवराव पेशवे, नागपूरकर रघुजी भोसले, मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, राणोजी शिंदे, महादजी शिंदे, उदाजी पवार, यशवंतराव पवार, पिलाजी गायकवाड, दमाजी गायकवाड, नाना फडणीस इ. कर्तृत्ववान मराठा सरदारांनी मोलाचे योगदान दिले.
शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी अठराव्या शतकात जसे साम्राज्य निर्माण केले तसेच ज्यावेळेस परकीय अहमदशहा अब्दालीने हिंदुस्थानवर वारंवार आक्रमण करून लुटालूट व अत्याचार सुरू केले त्यावेळेस राष्ट्ररक्षणाच्या कर्तव्य भावनेतून त्याच्याशी संघर्ष केला. १७५७ मध्ये अब्दालीला पराभूत करून अटकेपार भगवा झेंडा फडकावला व अटक ते कटक हिंदुंचे शक्तिशाली साम्राज्य निर्माण करून शिवरायांचे स्वप्न साकार केले.
पानिपतच्या समरभूमीवर १७६१ साली एक लाख मराठ्यांनी बलिदान देऊन देशाचे रक्षण केले. जरी युद्धात अब्दाली जिंकला तरी देशरक्षणाच्या ध्येयात मराठे यशस्वी झाले कारण त्यानंतर अब्दाली कधीही दिल्लीपर्यंत येऊ शकला नाही. दहा वर्षातच म्हणजेच १२ फेब्रुवारी १७७१ रोजी माधवराव पेशव्यांच्या मार्गदर्शनाखाली महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांनी दिल्ली जिंकून जवळजवळ ३० वर्षे दिल्ली व हिंदुस्थानचे रक्षण केले.
पानिपतमध्ये झालेल्या मराठ्यांच्या हानीचा फायदा घेऊन परकीय इंग्रजांनी सर्व हिंदुस्थानात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळेसही शिवरायांपासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी त्यांच्याशी शेवटपर्यंत संघर्ष केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य आणि अठराव्या शतकातील हिंदवी साम्राज्य हे हिंदुस्थान, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचे रक्षण आणि उत्कर्ष करणारे होते. अनेक शतकांच्या पराभूत आणि निराश मानसिकतेतून हिंदू समाज बाहेर पडून पुन्हा शक्तिशाली बनला. याच काळात हिंदू संस्कृतीचे पुनरुत्थान सुरू झाले. हिंदुंवरील अत्याचार आणि धर्मांतरे थांबली, जिझिया करासारख्या अनेक अन्यायकारी करांमधून हिंदुंची मुक्तता झाली, मानवी गुलामगिरीची दुष्ट परंपरा संपुष्टात आली, मठ-मंदिरांचा विध्वंस थांबला, हिंदू संस्कृतीतील कलांचा विकास सुरू झाला. शिवाजी महाराजांपासून सुरू झालेले हे कार्य ही हिंदुस्थानसाठी मोठी उपलब्धी ठरली.
जसे सध्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे अमृत पर्व चालू आहे तसेच यावर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच २ जून २०२३ रोजी (शिव) राज्याभिषेक शक ३५० प्रारंभ होत आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक प्रेरणादायी घटना आहे. या निमित्ताने या पावन पर्वात सामील होऊन सर्व भारतभर देशभक्तीचा जागर करावा तसेच शिवरायांच्या या गौरवशाली, प्रेरणादायी इतिहासाचा प्रसार व प्रचार करावा हेच सर्व भारतीयांना आवाहन…