National SecurityNews

महापराक्रमी भारतीय नौसेना… भाग 2

Indian Navy Day 2024

नौदलदिनानिमित्त भारतीय नौसेनेची यशोगाथा सांगणारी ३ भागांची विशेष मालिका..

आली समीप घटिका..

१९७१ मध्ये पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यात भयंकर यादवी सुरू झाली. भारताला यात पडावं लागणार हे तर नक्कीच होतं, फक्त केव्हा, एवढाच प्रश्न उरला होता. भूदल, नौदल आणि वायुदल तिघांचीही जोरदार तयारी होती. वायुदल प्रमुख प्रतापचंद्र लाल, नौदलप्रमुख ॲडमिरल सरदारीलाल नंदा हे वाट पाहत होते सरसेनापती आणि भूदलप्रमुख जनरल सॅम माणेकशा यांच्या इशाऱ्याची.

३ डिसेंबर, १९७१ या दिवशी पाकिस्तानी वायुदलाने काश्मीर आणि पंजाबमधील ११ भारतीय ठाण्यांवर एकाच वेळी बॉम्बफेक केली आणि तिन्ही भारतीय सैनिकी दलं पाकिस्तानवर तुटून पडली. भारतीय नौसैनिकांचं हे पहिलं मोठं युद्ध होतं. एकाच वेळी, पश्चिमेकडे कोचीन ते कारवार ते मुंबई ते कराची, असा पूर्ण अरबी समुद्र आपल्या वज्र मुठीत ठेवायचा होता, तर पूर्रवेला विशाखापट्टण ते चित्तगाँग ते कॉक्स बझार हा समुद्री परिसर, तसंच गरज पडल्यास पूर्व पाकिस्तानच्या गंगा, मेघना आदी नद्यांच्या मुखांमधूनही आत देखील घुसायचं होतं. शिवशिवणाऱ्या मनगटांचे बहादूर भारतीय जवान ‘अॅक्शन’साठी आसुसले होते. आणि ती ‘अॅक्शन’, तो थरार त्यांना लगेचच ४ डिसेंबरला मनमुराद अनुभवायला मिळाला.

कराची बंदरावर हल्ला चढवायला निघालेल्या जहाजांच्या भारतीय पथकाची गाठ चार जहाजांच्या पाकिस्तानी पथकाशी कराची बंदराच्या दक्षिणेला समुद्रात सुमारे १७ नॉटिकल मैलांवर (भूमीवर सुमारे ३१ कि.मी.) पडली. मध्यरात्रीच्या अंधारात म्हणजे, रात्री साडे दहाच्या सुमारास जबरदस्त झाली….आणि भारतीय नौदलाने चारही पाकिस्तानी जहाजं साफ बुडविली. भारतीय नौदलाने या युद्धात प्रथमच सोव्हिएत रशियन बनावटीच्या ‘स्टाईक्स’ या प्रक्षेपणास्त्राचा उपयोग केला. अरबी सुमद्र परिसरात करण्यात आलेला ‘सरफेस टू सरफेस मिसाईल’चा हा पहिला प्रयोग.

कराची बंदराची पहिली संरक्षक फळी अशा प्रकारे साफ कापून काढल्यावर ‘आयएनएस निःपात‘, ‘निर्धात‘, ‘वीर‘,’किलतान‘, ‘कटचाल‘ आणि ‘पोषक‘ या सहा भारतीय युद्धनौकांनी ठरल्याप्रमाणे कराची बंदरावर हल्ला चढविला. तेवढ्यात आणखी काही जहाजं आडवी आली. रात्रीचे ११ वाजले होते, पुन्हा ‘स्टाईक्स’ प्रक्षेपणास्त्रांना बत्ती दिली गेली. परिणामी, ‘मुहाफिज‘ ही विनाशिका आणि ‘व्हीनस चॅलेंजर’ हे दारूगोळा पुरवठा जहाज समुद्रतळाशी गेले, तर ‘शाहजहाँ’ ही विनाशिका जबर जायबंदी झाली. आडवे आलेल्यांना अशा रीतीने आडवे पाडल्यावर ‘आयएनएस निःपात’ने कराची बंदरातल्या केमारी इथल्या पेट्रोल टाक्यांच्या दिशेने पुन्हा दोन ‘स्टाईक्स’ प्रक्षेपणास्त्रं सोडली. त्यातल्या एकाचा नेम चुकला, तर दुसऱ्याने मात्र अचूक लक्ष्यवेध केला. प्रचंड स्फोट झाला. एक प्रचंड थरारनाट्य अनुभवून, नव्हे घडवून, सहाही भारतीय नौका सुखरूपपणे भारतीय सागरी सीमेकडे पसार झाल्या.

अरबी समुद्रात हे घडत असताना इकडे पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात याहीपेक्षा विस्मयकारक नाट्य घडत होतं. भारतीय विमानवाहू नौका ‘आयएनएस विक्रांत’ ही पूर्व पाकिस्तानची सागरी कोंडी करण्यासाठी बंगालच्या उपसागरात तैनात करण्यात आली होती. ती विशाखापट्टण बंदरातून बाहेर पडून चित्तगाँगकडे जात असताना वाटेतच तिला गाठून बुडवायची, अशी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना पाकिस्तानी नौदलप्रमुख ॲडमिरल मुझफ्फर हसन यांनी आखली. पाकिस्तानी पाणबुडी ‘पीएनएस गाझी’ हिला ‘विक्रांत’च्या मागावर सोडण्यात आलं.

भारतीय नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल नीलकंठ कृष्णन् यांनी ‘आयएनएस राजपूत’ या विनाशिकेचे कॅप्टन इंदरसिंग यांना संदेश पाठविला. ‘गाझी’ चेन्नई ते विशाखापट्टणच्या दरम्यान कुठेतरी आहे. कॅप्टन इदरसिंग ‘राजपूत’ला घेऊन विशाखापट्टण बंदरातून बाहेर पडले. दि. ३ डिसेंबर, १९७१ वेळ रात्री ११.४० बंदरातून खुल्या समुद्रात पोहोचेपर्यंत मध्यरात्र झाली. ४ डिसेंबर तारीख लागली आणि टेहेळ्याने इशारा दिला की, जहाजाच्या वाटेत काहीतरी अडथळा दिसतोय. कॅप्टनने दिशा बदलत पूर्ण वेगाने जहाज पुढे काढलं आणि त्या अडथळ्याच्या दिशेने दोन डेप्थ चार्जेस सोडले.

प्रचंड स्फोट झाले. ते वाजवीपेक्षा इतके मोठे होते की, ‘राजपूत‘ जहाजही गदागदा हादरलं. इतकंच नव्हे, तर विशाखापट्टण बंदरपट्टीही हादरली. अकल्पितपणे ‘राजपूत’च्या त्या तोफगोळ्यांनी ‘पीएनएस गाझी‘च उडविली होती. ८२ नौसैनिक, ११ अधिकारी, असे एकूण ९३ लोक आणि ‘एम-के १४’ हे अत्याधुनिक ‘टॉरपेडो‘ यांनी सुसज्ज अशी खतरनाक ‘गाझी’ पाणबुडी बंगालच्या उपसागराच्या तळाशी छिन्नभिन्न होऊन पडली. पूर्वेकडच्या पाकिस्तानी आरमाराचा दमच खलास झाला. ‘विक्रांत’ला असणारा धोका संपला. भारतीय नौदलाने पूर्व पाकिस्तानची व्यवस्थित सागरीकोंडी करून पाकिस्तानी सैन्याला समुद्रमार्गे मिळू शकणारी रसद तोडली.

भारतीय नौदलाच्या या भव्य यशाला किंचित गालबोट लागलं ते ‘आयएनएस कुकरी’च्या जाण्याने. दि. ८ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर पश्चिमेकडे दीव जवळच्या समुद्रात ‘कुकरी’ ही फ्रिगेट जातीची भारतीय युद्धनौका ‘हँगोर’ या पाकिस्तानी पाणबुडीने बुडविली. १७६ सैनिक आणि १८ अधिकारी यांच्यासह कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांचेही बलिदान झाले. त्याकरिता कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांना मरणोत्तर ‘महावीर चक्र’ देण्यात आलं.

क्रमशः

Back to top button