संत गाडगे महाराजांच्या पुण्यस्मृती निमित्त ४ भागांची विशेष मालिका..
संत गाडगे महाराजांनी रचलेले अभंग..
- ”धन्य धन्य सद्गुरु गजानना”
धन्य धन्य सद्गुरु गजानना, सांग गजरूक्षाची लीला ।
पाय पादुका वाहती वाटे, कर्त्यावर धरूनी ध्याना ।।
भुज दंडात जपतो नाम, मृदंग ताल वाजतो जय जय कार ।
स्वर सुंदर पद गुंजतीते, आश्रय घेऊनी सकल भय हारी ।।
अनुग्रह देई सद्गुरु गजानना, ज्ञान ध्यान संचरीतीला ।
जय जय कार संगीत होते, सांग वातेवर दुःखांचे फेरी ।।
- ”मनाचा मुजरा”
मनाचा मुजरा धरुनी जरी घ्यावा, जन्म जन्माचा पुण्य लाभावा ।
असतीच करुनी नमस्कार, सद्गुरु समर्थाचा उद्धार ।।
दुःखांच्या गर्दीत सुखाचा जल भरावा, मनातल्या तेजाचा तू विश्वास घ्यावा ।
जणू आत्मा संतोषाच्या विवासावा, तोळे त्यांच्या चरणांनी जिवावा ।।
देह सोने नाही मन ही चांदीची, तुझ्या चरणी माझी दोन झाडी झाली ।
मनाच्या तापाची दोर तुला आली, तू माझ्या संत तुकारांचे विश्वास धराली ।।
अंधश्रद्धांविरोधी समाजजागृती
गाडगेबाबांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात कर्मकांड, अंधश्रद्धा यांचा अतिरेक झाला होता. समाज भरडून निघत होता, तेव्हा या अवलियाने एकेश्वरवादी तत्त्वज्ञान मांडले. ग्रंथप्रामाण्य, पोथिनिष्ठता, सण, श्राद्ध, मूर्तीपूजा यावर कठोर प्रहार करून ज्ञानप्रसाराचे आगळेवेगळे जागरण उभे केले. गावोगाव भजन-कीर्तन करून समाजप्रबोधनाचा नवा आविष्कार प्रस्थापित केला. गाडगेबाबा आपल्या कीर्तनात अध्यात्म सांगण्याऐवजी भौतिक समस्यांवर बोट ठेवून विज्ञान सांगत. ते म्हणत, ‘बाबांनो परमेश्वर एक आहे, तो निर्विकार आहे. ही ‘धर्माची देवळे व देवळांचा धर्म’ थोतांड आहे. या दगडी देवाचे पाय रगडू नका.’ यासाठी आपल्या कीर्तनातून संत कबीराचा दोहा सांगत-
जत्रामे फत्रा बिठाया तीर्थे बनाया पाणी
भई दुनिया बडी दिवानी ये तो पौसे की धुलधानी
या यात्रा-जत्रा म्हणजे भोळ्या बहुजन जनतेची लूट करण्याची ठिकाणी आहेत. मग पुढे म्हणत, ‘अरे, देव मंदिरात नाही की मूर्तीत नाही, तर माणसांत आहे. भुकेल्यांना अन्न द्या, अडाण्यांना ज्ञान द्या, तिथेच परमेश्वर आहे.’
गाडगेबाबा एकेश्वरवादी असल्यामुळे नवस-सायस यावरदेखील कडाडून हल्ला चढवत. या कोंबड्या-बकऱ्यांच्या नवसापोटीच त्यांच्या वडिलांचे घर उदध्वस्त झाले होते. त्यामुळे स्वतःच्या दाहक अनुभवातून नवसाबाबत पोटतिडकीने बोलत. आपल्या कीर्तनात ते म्हणत, ‘बापहो मुक्या प्राण्याचे बळी देऊन माणूस कधी सुखी झाला आहे काय? परमेश्वर प्रसन्न झाला आहे काय? अरे, शेळीच्या लेकराचा जीव घेऊन तुम्हाला लेकरू कसे होईल? माय-माऊल्यांनो हा अधर्म आहे.’ गाडगेबाबा धर्माची चिकित्सा करत लोकांना अगदी पोटतीडकीने सांगत की, ‘बळीप्रथा कोणत्याही धर्मग्रंथात सांगितलेली नाही.’ लोकांना सोप्या भाषेत पटवून देण्यासाठी ते तुकोबाचा अंभग म्हणत,
नवसे कन्यापुत्र होती।
मग का करणे लागे पती ।।
पुन्हा कबीरांचा दोहा सांगत,
मांस-मांस सब एकही है।
‘मुर्गा-बकरा-गाय, ऐसा मानव चुतिया बडा प्रेमसे खाए,
आपने बेटे का सिर मुंडावे देख सुरा लग जाए,
दुसरोंकि तो गर्दन काटे जरा शरम न आए’
या पद्धतीने गाडगेबाबांनी ‘नवस’ या अंधश्रद्धेविरुद्ध प्रचंड जनजागृती करून महाराष्ट्रातील ६७ खेड्यांत ही बळीची प्रथा बंद केली. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कुटुंबांना उपयोगी येणाऱ्या प्राणीमात्राची रक्षणाची मोहीम राबवली, अनेक यात्रेतील हिंसा बंद करण्यासाठी प्रसंगी प्राण पणाला लावले.
अंधश्रद्धा, कर्मकांड यांबरोबर त्यांच्या कीर्तनातील मुख्य विषय शिक्षण, जातीभेद हा होता. कधीही शाळेत न गेलेल्या माणसाने समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे, ही अफलातून किमया होती. ते म्हणत, ‘बाबांनो, विद्या हे फार मोठे धन आहे. शिक्षण घ्या, शिक्षण अडाणी माणूस आणि पशू यात काहीच फरक नाही.’ ते पुढे म्हणत, ‘मायबापांनो, एक वेळ उपाशी राहा, बापांनो एका धोतराचे दोन धोतर करून नेसा, पण लेकराले शाळेत घाला. शिक्षणाविना माणूस धोंडा.’
‘सर्व अनर्थ एका अविद्येने केले’ ही शिकवण एका निरक्षर माणसाने समाजाच्या मनावर बिंबवली. यातून त्यांच्या विचारांची महती लक्षात येते. जातीप्रथेविरुद्ध आवाज उठवताना गाडगेबाबा सांगत, ‘बापहो माणसामाणसात फरक कराले तुम्हासले कोणी सांगितले, तुम्हाला कुणी जात विचारली तर माणूस हिच जात सांगा. आपण सर्व एकाच परमेश्वराचे लेकरे आहोत. मग ही शिवाशिव कशाला? बाबाहो, या जगात स्त्री आणि पुरुष अशा दोनच जाती आहेत. हा जातीभेद आपल्या समाजाला देशाला लागलेला एक डाग आहे, कलंक आहे.’
याशिवाय गाडगेबाबांनी हुंडापद्धतीवरदेखील जोरकस हल्ला केला होता. ते म्हणत, ‘हुंडा देऊ नका, घेऊ नका, हुंडा घेणाऱ्यांच्या विवाहसमारंभाला जाऊ नका, कर्जरूपी उकीरड्यावर नव-जोडप्यांचा संसार थाटू नका. अगदी झुणका-भाकरीने लग्न समारंभ साजरा करा.’
वैयक्तिक आचरणाच्या बाबतीत अग्निसारखे दाहक असलेले बाबा, न कधी कोणाला स्वतःच्या पायाला हात लावू देत, ना कुणाला आपला शिष्य म्हणवीत!
आपल्या नातलगांबाबतही बाबा तितकेच कठोर होते. प्रसिद्धीस आल्यावरही पुढील काळात बाबांनी आपली पत्नी, मुलगी, मुलगा यांनाही कोणत्याही धर्मशाळेतली जागा वा सवलत न देता, त्यांनी आपली झोपडी बांधून आपली भाकरी आपण कमवून खाण्यास भाग पाडले. बाबांचे कुटुंबीय म्हणून कोणी त्यांना आदराने काहीबाही दिलेले कळले, तर बाबा चटकन जाऊन त्या गोष्टी आपल्या ताब्यात घेऊन गोरगरीबांना वाटून टाकीत.
अनेक जवळच्या नातेवाईकांच्या निर्वाण प्रसंगी बाबांनी ना सुतक पाळले, ना आपले काम थांबवले. अगदी पोटचा मुलगा पुण्यात पिसाळलेले कुत्रे चावून मरण पावल्याची खबर मिळूनही, बाबांनी परत न फिरता, रत्नागिरीजवळच्या खारेपाटण या गावी ‘ऐसे गेले कोटयानुकोटी, काय रडू एकासाठी’ या विषयावर कीर्तन केले!
समर्थांनी लिहिलेली सर्वच्या सर्व आणि न लिहिलेलीही अनेक ‘निःस्पृहलक्षणे’ कोणताही गाजावाजा न करता बाबांनी शंभर टक्के आचरणात आणली !
गावी राहती गरीब उपवासी । अन्नछत्र लावितोसी काशी ।
हे दान नव्हे का व्यर्थ । तुझं गावच नाही का तीर्थ ।’
पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या.
कीर्तनात शेवटी गाडगे महाराज म्हणतात,
आपल्या गावाची जो सेवा करितो । तोची कीर्तीने मानाने तरतो ।
दास तुकड्या म्हणे, होईल सार्थ । तुझं गावच नाही का तीर्थ ।।
याच अलीकडच्या काळात संत गाडगेबाबांनी जी लोकजागृती केली त्याला तोडच नाही. केवळ वाचाळवीर न राहता कृतिशील वैराग्यसंपन्न राष्ट्रसंत असं त्यांचं वर्णन करता येईल.
गाडगेबाबांचे मन निर्मळ होते. त्यात त्या अनामिक साधूचा उपदेश, कर्जेव्यसने, अंधश्रद्धा, निरक्षरता आणि निरनिराळ्या रूढींच्या घातक परिणामांनी, सुधारणेचे तळे काठोकाठ भरले. परिवर्तनाचा भक्कम बेलवृक्ष उभा राहिला. घराची अंगणे, चावडया, पटांगणे, पायखाने, कसाईखाने, देवस्थाने, पंचायती, स्मशाने यांची देवळे रावळे बनली.बाबांनी आपला समाजविनायक तिथेच शोधला. त्याची अवस्था फारच बिकट होती. मग त्यांनी आपल्या कठोर पण परखड विचारसरणीने त्याला धुवूनपुसून स्वच्छ केला, त्याच्या भळाभळा वाहणाऱ्या जखमांवर मानवतेचे मलम लावले, त्याला साक्षरतेची वस्त्रे नेसवली आणि अनेक ‘स्वकर्मकुसुमांनी’ या विनायकाची पूजा केली.
गाडगे बाबांची पूजा देवाला पावली. त्याने बाबांना भरभरून आशीर्वाद दिले, त्यांच्यावर मानसन्मानांची फुले उधळण्याचा प्रयत्न केला. पण या विरक्त सुपुत्राने तो मनसुबा चक्क उधळून लावत, ती फुले पुन्हा समाज विनायकाच्याच अंगावर उधळली! अशी फुले उधळत उधळत, ‘परीट’ समाजात जन्मलेला हा डेबू, समाजातील विषमतेचे सर्व डाग धुवून स्फटिकासारखा, पारदर्शी होऊन आपल्या कर्मभूमीत २० डिसेंबर १९५६ या दिवशी गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला.. असा जयघोष करीत कायमचा विसावला!
अशा अफाट कर्तृत्वाची ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी, वाचकांच्या घरी, सरस्वतीमंदिरांच्या द्वारी, सर्व स्वच्छतागृही, हरिनामसप्ताही, नदीतीर्थक्षेत्रांच्या घाटी, दवाखानी, सुफळ संपूर्ण !
समाप्त.