लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीवीरांची आज पुण्यतिथी आहे. वस्ताद लहूजी बुवा साळवे हे वासुदेव बळवंत फडकेंचे शस्त्रगुरु होय. ते मातंग समाजातील होते. पूर्वी पेशव्यांच्या सैन्यात असलेले साळवेबुवा अत्यंत शूर आणि लढवय्ये होते. १८१८मध्ये पेशवाई खालसा झाल्यावर त्यांनी पुण्यातून अनेक तरुण शस्त्र शिक्षण देऊन तयार केले. वासुदेवरावांनी, लहूजी बुवा आणि महार समाजातील राणबा वस्तादांकडून शस्त्र चालविणे,घोडा फेकणे, दांडपट्टा चालवणे, बंदुका चालवणे, अनवाणी पावलांनी काट्या-कुट्यातून धावणे, तलवार तोंडात धरून कडा चढणे-नदी पोहून जाणे आदी अनेक प्रकार शिकून घेतले….!
महत्वाचे म्हणजे सव्वाशे वर्षांपूर्वी ब्राह्मण समाजातील एक पुणेकर तरुण या दोघांकडे हे शिक्षण घ्यायला जातो ही आजच्या काळात अविश्वसनीय वाटणारी गोष्ट नव्हे काय.? त्या काळातील एका ब्राह्मणाला या उभयतांकडून शिक्षण घेणे कमीपणाचे वाटले नाही आणि त्या दोघांनीही बामणाला कसे शिकवू असा विचार केला नाही. विशेष म्हणजे फडकेंना त्यांच्या जातीबांधवांनी या कृत्याबद्दल बहिष्कृत केले नाही. त्या काळात जाती होत्या पण द्वेष नव्हता, स्वातंत्र्योत्तर काळात जाती मोडाच्या घोषणा देत केवळ जातीय द्वेषच पसरवला जात असून जो संपूर्ण समाजासाठी घातक आहे. हे लक्षात घेतले की या सर्व लोकांचे मोठेपण अधोरेखित होते…!
सरकार विरुद्ध युद्ध पुकारणे, त्यासाठी पैसे आणि दारुगोळा साठविणे, सरकार विरुद्ध असंतोष निर्माण करणे आणि राजद्रोह हे चार भयंकर आरोप ठेवले गेलेले १८५७ च्या स्वातंत्र्यसमरानंतरचे फडके हे पहिले आणि म्हणूनच आद्य क्रांतीवीर होय. सामान्य जनतेतून उठाव करावा हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण यश आले नाही. ब्रिटीशांच्या न्यायालयात ‘हिंदी प्रजासत्ताक’हा शब्द उच्चारणारे ते पहिले क्रांतिकारक होते. आज प्रजासत्ताक दिन साजरा करणाऱ्यांनासुद्धा प्रजासत्ताकाच्या उद्गात्याचे विस्मरण होते. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली…त्यासाठी त्यांची रवानगी भारताबाहेर दूर येमेन मधील एडनच्या तुरुंगात करण्यात आली. तेथे अनन्वित छळ सोसून १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मातृभूमीची आठवण काढत त्यांनी आपले प्राण सोडले. आपण अशा क्रांतीकारकांना विसरायला नको.!
या दोघा गुरु-शिष्यांचा पुण्यस्मृतीदिन एकच असावा हा योगायोग विलक्षणच..! लहूजी बुवा आणि वासुदेव बळवंत फडकेंना विनम्र आदरांजली….!!