बंगळुरू, दि. १७ मार्च : कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने दर्गा आणि मशिदींमध्ये रात्री १० ते पहाटे ६ या वेळेतपर्यंत राज्यात दर्गा आणि मशिदीत लाऊडस्पीकर लावण्यास मनाई केली आहे. अशा आशयाचे परिपत्रक जारी करण्यात आले असून दिवसा लाऊडस्पीकर लावताना लाऊडस्पीकरचा आवाज हा एअर क्वालिटीच्या मानकांनुसार असावा, त्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
राज्यातील ध्वनी प्रदूषणाची समस्या रोखण्यासाठी कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सलत, जुमा कुतबा, बयान आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांच्या दरम्यान मशिदीतील लाऊडस्पीकरचा उपयोग करण्यात यावा. तसेच मशिदीच्या जवळपास कानठळ्या बसविणारे फटाके फोडण्यासही बंदी घालण्यात आली असून मशिदीच्या आत मुअज्जिनच्या अँम्लिफायरचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
याचबरोबर मशिद परिसर आणि राज्यात फळ आणि सावली देणारे वृक्ष लावणे व उन्हाळ्यात पशू पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून जागोजागी पाण्याची टाकी लावण्याचे निर्देशही दिले आहेत.