Opinion

आणीबाणीची परिस्थिती.. 10-11 वर्षाच्या मुलीच्या नजरेतून

तर त्या ऐन दिवाळीत, नेऊरगावला घरी पोलीस आले आणि बाबांना घेऊन गेले. आणीबाणी जाहीर झाल्याच्या, कोणाकोणाला अटक झाल्याच्या चर्चा तर घरात जूनपासून चालूच होत्या. त्यामुळे थोडी अपेक्षित होतीच  बाबांची अटक. पण अपेक्षित असलेल्या गोष्टीही प्रत्यक्ष घडतात तेव्हा त्यांचा धक्का बसतोच. ते क्षण जिव्हारी लागतातच. 

११ वर्षांच्या मला तेव्हा कसे  वाटले होते  ते अजूनही लख्ख आठवत असले तरी त्याचे नेमके वर्णन नाही करता यायचे. एकाचवेळी काहीतरी उजाड झाल्याची आणि आभाळ दाटून आले आहे, पण पाऊस पडत नाही ..श्वासही घेता येत नाही ..असे काहीसे. पकडून नेलेल्याना तुरुंगात ठेवल्यावर मारतात का? ह्या प्रश्नाचे उत्तर आईने ,”बाबा राजकीय कैदी असल्याने नाही मारणार ” असे दिल्याने थोडे बरेदेखील  वाटले होते. 

 त्या आधीचा  सतत २/३ वर्षांचा दुष्काळ आणि नंतरची आणीबाणी सगळे मिळून आर्थिक परिस्थिती एकदमच झकास झाली असणार. पण आईबाबांनी नेहमीच आम्हाला असे वाढवले होते की  आम्ही  श्रीमंत होतो तेव्हाही पाय जमिनीवर होते आणि   परिस्थिती तितकी चांगली राहिली नाही  तरीही आमच्या मनःस्थितीत विशेष फरक पडला नाही. 

बाबा जेलमध्ये. मग आईला नोकरी करायला लागली. ती नोकरी औरंगाबादला नाही तर दुसऱ्या गावाला होती. आई सोमवारी सकाळी जायची ती शनिवारी रात्री परत यायची. शनिवारी आली की  एका दिवसात घरातले निवडण, दळण, आम्हा चौघा भावंडांना पुरेल असे चिवडा वगैरे करून ठेवणे. तिची खूप धावपळ असायची. त्यातून वेळ काढून ती माझा अभ्यासदेखील घ्यायची. मग आठवडाभर घर सांभाळायची माझी ताई. ती तेव्हा फक्त  १६ वर्षांची. घरातले केर, स्वैपाक, तिचे माझे कपडे धुणे..झालेच तर माझी वेणी घालून माझा डबाही भरणे ..हे सगळे सांभाळून तिला कॉलेज आणि अभ्यास करायचा असायचा. मी मात्र नुसती आयतोबा होते. आता मागे वळून पाहताना वाटते की आणीबाणीचा मानसिक त्रास तर सगळ्यांनाच झाला. पण आमच्या घरात शारीरिक कष्ट जर का कोणाला करायला लागले असतील तर आई आणि ताईला. त्या दोघींमुळेच आमचे घर तेव्हा सर्वार्थाने चालले. 

 जरी आठवडाभर आम्ही चौघे भावंडेच औरंगाबादला असायचो तरी आईला आमच्या सुरक्षेची काळजी करायला लागू नये म्हणून सरकारने घरावर खास CID पहारा नेमलेला होता !!! त्यातून मार्ग काढून, वेष बदलून, नाव बदलून संघाचे लोक घरी येऊन जायचे. मग हे बाबांना कळवायचे कसे?

आणीबाणीत एकदा मा. नाना ढोबळे घरी येऊन गेले. एरवी ते कधी औरंगाबादला राहायला यायचे तेव्हा  सकाळी योगासने करत आणि  डोक्यावर पांघरूण (बहुतेक औरंगाबादच्या थंडीमुळे असेल) घेऊन, प्राणायाम करत. म्हणून मी त्यांना भोकाडीकाका म्हणायची. आईने सांगितले पत्रात लिही,   भोकाडीकाका येऊन गेले!! बाबांना निरोप मिळाला, नानांना अजून अटक झालेली नसल्याची बातमी कळली आणि नानांविषयी तसेच बाहेरच्या संघकामाविषयीची त्यांची  काळजी  कमी झाली.

त्या काळात आमच्याशी संबंध ठेवणे धोक्याचे आहे हे लक्षात घेऊन काही संबंध दुरावले. त्यांना दोष नाही देता येणार. कारण सगळ्यांना थोडीच असे सामाजिक कामांचे पिसे लागलेले असते? आमच्याशी संबंध ठेवून सरकारी रोष कोण ओढवून घेणार?  पण आपले सगळे मात्र त्या काळातही बरोबर होते, हे महत्वाचे! 

आता विचार करते तेव्हा वाटते की  तेव्हा आम्ही भाड्याने ज्या घरात राहायचो, ते घरमालक सरकारी नोकर होते. पण आणीबाणी आली, बाबा जेलमध्ये गेले  तरी त्यांनी आम्हाला घर सोडायला सांगितले नाही हे नशीबच. नाहीतर अगदीच काय म्हणतात  ते..सोने पे सुहागा ..तशी वेळ आली असती. 

 हे सगळे विस्ताराने लिहायचे कारण एवढेच की  बाबांना जेलमध्ये असताना घरची चिंता वाटत नसेल का? तर नक्कीच वाटत असेल. जरी तुरुंगवास काही त्यांच्यासाठी नवा नव्हता. भागानगर सत्याग्रह असेल, ४८ ची संघबंदी असेल, कितीदा तरी ते तुरुंगात जाऊन आलेले होते. पण ह्यावेळी घर, शेती, आई ह्याबरोबरच आम्हा चौघांना पण सोडून जावे लागले होते. 

पण त्या वैयक्तिक चिंतेवर मात करून बाबा नाशिक जेलमध्ये कसे वागत होते हे समग्र जाणून घ्यायचे असेल तर मा. भाऊसाहेब जहागीरदार ह्यांचा “कारागृहातील अनभिषिक्त सर्वाधिकारी ” हा लेख वाचायला हवा. बाबांवरच्या,  माझ्या सर्वात आवडत्या लेखांपैकी तो एक लेख आहे.

 बाबांसारखेच चिंतेत किंवा बाबांपेक्षा जास्त चिंतेत असलेले सगळे लोक ..त्यांचे मनोधैर्य टिकावे म्हणून विविध कार्यक्रम असतील, अभ्यासवर्ग असतील, शाखा असेल, शिबिररचना असेल, तिथेही उपलब्ध असलेल्या साधनांनिशी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने साजरे केलेले दहीहंडी, पोळा, दिवाळी असेल, बाबांनी आणि सगळ्या संघ स्वयंसेवकांनी  एकूण धमाल उडवून दिली होती. त्यावेळेचा अगदी सकारात्मक उपयोग करून घेतला होता. 
 तुरुंगात सगळेच काही संघाचे नव्हते, इतर होते त्यांचे संघाविषयीचे समज फार चांगले नव्हते. त्यांच्याही संघाविषयीच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्याचे मोठे काम तिथे घडले. सरकारी अधिकाऱ्यांना बाबांच्या शब्दाचे वजन माहिती होते. तुरुंगातील लोकांसाठी बाबानी त्या वजनाचा उपयोगही केला. 

सतत सगळ्या कार्यकर्त्यांची विचारपूस , भेटी.. बाबांनी  कधी सांगितले नाही, पण बाकीच्यांकडून नंतर कळले की, बाबांच्या खोलीत त्यांचे जेवणाचे ताट, नाश्त्याची थाळी शेजारच्या खोलीतील कार्यकर्त्याने घेऊन झाकून ठेवलेली असायची. दिवस दिवस त्याला बाबांनी स्पर्शच केलेला नसायचा.

 भाऊसाहेब लिहितात, ” मनावर अतिशय भार. शरीरावर ताण आणि बुद्धी सर्वांच्या कल्याणाची कल्पना करत असल्याने मेंदूची अविश्रांत अवस्था प्रकृतीवर परिणाम करून गेली. तरीही स्वत:च्या प्रतिभेने, वागणुकीने, विनोद्बुध्दीने सर्वानी सुखी व्हावे असाच प्रयत्न त्यांनी सतत केला.”  

आणीबाणी संपताना बाबांनी  जेलमधून तुरुंगवासाचे सर्टिफिकेट आणले होते की नाही, मला माहिती नाही. पण डायबेटीस मात्र नक्की सोबत आणला होता. त्यानेही बाबांना  शेवटपर्यंत विश्वासाने साथ दिली. बाबांचा मोह त्यालाही पडला असेल. मग एकसे मेरा क्या होगा ? असे बाबांना वाटले असेल. म्हणून मग नंतर हृदयविकार पण आला.  दिलवाले तो थे ही, अब दिल के मरीज भी बन गए!

हेडगेवार रुग्णालय  व्यवस्थित चालते आहे की  नाही पाहायला की  काय कोण जाणे, पण कितीदा तरी तिथे ऍडमिट व्हायची वेळ आली. कितीदा तरी कोणाचे म्हणणे न ऐकता बाबा रुग्णालयातून  निघून येऊन कार्यक्रमांना गेले.  प्रत्येक क्षण समरसून, भरभरून जगावं कसं आणि मरतानाही असे झकासपैकी मरावे कसे, हे शिकावे तर बाबांकडून !!-

वृंदा टिळक. (ठाणे )

Back to top button