बाभळेश्र्वर, दि. २६ जून – संपूर्ण जग विविध माध्यमातून पुढे जात असताना महाराष्ट्राचे सांप्रदायिक महत्त्व वाढविण्यासाठी बाभळेश्वर (जि. नगर) येथील सद्गुरू नारायणगिरी गुरुकुलचे विद्यार्थी आता इंग्रजीत कीर्तन करू लागले आहेत. भागवत धर्माची पताका आता जगभर पोहोचण्यास त्यामुळे बळ मिळणार आहे, असा विश्वास गुरुकुलचे अध्यक्ष भगवान महाराज डमाळे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाचं मोठं योगदान आहे. कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाने समाज प्रबोधनाचे काम सर्व परिस्थितीत केले आहे. बदलत्या काळानुसार वारकरी संप्रदायाने समाज प्रबोधनासाठी आधुनिक मार्ग स्वीकारला असून बाभळेश्वर येथील कीर्तन शिकणाऱ्या तरुणांनी आता इंग्रजीत कीर्तन करायला सुरुवात केली आहे. सोशल मिडिया द्वारे हे कीर्तन आता जगभर पोहोचत आहे.
सद्गुरु नारायणगिरीजी गुरुकुल येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे प्रमोद महाराज डुकरे आणि राम महाराज शिंदे हे दोन्हीही विद्यार्थी अस्खलित इंग्रजीत कीर्तन करतात.
वारकरी सांप्रदायाचे शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीला मराठीत किर्तन करणाऱ्या या विद्यार्थ्यांना नंतर इंग्रजी भाषेत किर्तन करण्याचे प्रशिक्षण मिळाले. मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केलेले मूळ नेवासा येथील रहिवासी असलेले ह.भ.प राम महाराज शिंदे आणि वैजापूर येथील रहिवासी असलेले प्रमोद महाराज डुकरे हे अस्खलीत इंग्रजीत कीर्तन करतात.
वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे अंग म्हणजे कीर्तन. कारण वारकरी संप्रदाय टिकवायचा असेल तर तो कीर्तनाच्या माध्यमातून अधिकाधिक टिकवता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. सगळे जग आज सोशल मीडिया किंवा इतर अनेक माध्यमातून पुढे चाललंय मग आपला संप्रदायही जगाबरोबर चालला पाहिजे. या जगात आपल्या संप्रदायाचे महत्त्व अनंत काळापर्यंत टिकणार आहेच परंतु ते वाढवण्याचा प्रत्येक पिढीने प्रयत्न करायला पाहिजे. सद्गुरु नारायणगिरी गुरुकुलमध्ये विदयार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक प्रशिक्षण देऊन एकविसाव्या शतकातील कीर्तनकार तयार होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अध्यात्माचा दृष्टांत आणि त्याला विज्ञानाचा सिद्धांत देऊन तो जगासमोर कसा मांडता येईल याचे प्रशिक्षण आम्ही देतो, असेही भगवान महाराज डमाळे म्हणाले.
सद्गुरु नारायणगिरीजी गुरुकुलाचे विद्यार्थी फक्त कीर्तनकार नसावा तर तो उच्चशिक्षित आणि सुसंस्कारित कीर्तनकार असावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. आजचा काळ हा विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा असून, आपल्याला वारकरी संप्रदायाचे विचार रुजविण्यासाठी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालावी लागणार असल्याचे मत गुरुकुलचे अध्यक्ष भगवान महाराज डमाळे यांनी व्यक्त केले आहे.
आपल्या देशातील काही लोक परदेशात गेल्यावर आपला वारकरी संप्रदाय तिथं प्रेझेंट करण्यास कमी पडतात.आपला संप्रदाय रुजविण्यासाठी त्यांच्या भाषेत मांडला जावा. त्याची गोडी लागावी या हेतूने इंग्रजीत कीर्तन करतो, असे इंग्रजी कीर्तनकार राम महाराज शिंदे म्हणाले
तर, आपल्या वारकरी संप्रदायाची विचारधारा आहे, संतांचे विचार परदेशात सुद्धा पोहोचावे. सांप्रदायिक भाषेच्या बंधनात अडकून न राहता तो विचार परदेशातील लोकांपर्यंत पोहोचावा आणि आपला संप्रदाय मोठ्या प्रमाणावर वाढावा यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, असे प्रमोद महाराज डुकरे यांनी सांगितले.