Opinion

पं. दीनदयाळ उपाध्याय – एक अनाम नायक

भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन आणि आपल्या स्वातंत्र्याच्या हीरक (अमृत) महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सरकारतर्फे काही स्तुत्य उपक्रम  सुरु झालेले आपण गेल्या काही दिवसांत बघितले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची होळी करणाऱ्या, देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या अनेक ‘अनाम’ वीरांची ओळख आपल्याला या निमित्ताने झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीत ज्यांनी मोलाचे योगदान दिले, समर्थ आणि संपन्न भारताचे एक सुस्पष्ट चित्र डोळ्यासमोर ठेवून ते साकार करण्यासाठी सुसंगत विचारसरणी, कार्यक्रम आणि त्यांची अंमलबजावणी कुठलाही गाजावाजा न करता पण सातत्याने आणि विश्वासाने करत राहून त्या चित्राचे विविध आयाम लोकांच्या मनात, विचारात रुजविण्याचा प्रयत्न केला अशी अनेक नररत्न आपल्यापैकी अनेकांना माहितीही नाहीत. अशा अनेक ‘अनाम’ वीरांपैकी एक होते पं. दीनदयाळ उपाध्याय.
 पं. दीनदयाळ उपाध्यायांची  चपखल आणि पटकन लक्षात येईल अशी ओळख म्हणजे, गेली सात वर्ष सातत्याने आणि त्यापूर्वी साधारण १९९८ ते २००३ या काळात ज्या पक्षाच्या सुस्पष्ट, तडाखेबंद आणि केवळ देशहितच  डोळ्यासमोर ठेवून आखलेल्या आणि राबविलेल्या ध्येयधोरणांमुळे, सध्याच्या कठीण काळात सुद्धा आज आपला देश आपल्या ध्येयाकडे जोमाने वाटचाल करीत आहे त्या  भारतीय जनता पक्षाचा जो मूळ जनक पक्ष, म्हणजे भारतीय जनसंघ, त्या जनसंघाचे एक संस्थापक सदस्य म्हणजे  पं. दीनदयाळ उपाध्याय.
       उत्तर प्रदेशातील एक छोट्याशा खेड्यात जन्मलेला दीनदयाळ लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीचा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, लहान पणीच आईवडिलांचे छत्र हरपलेले, परंतु अशाही परिस्थितीत आपल्या आजोळी राहून त्यांनी आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कायम अव्वल राहून पूर्ण केले. त्यांची हुशारी पाहून त्यावेळच्या सिक्कर संस्थानच्या नरेशांनी महाराजा कल्यानसिंग, तसेच बिर्ला कॉलेज, पिलानी ने त्यांना स्कॉलरशिप तर दिलीच परंतु शिक्षण पूर्ण होताच प्राध्यापक पदाची ऑफरही दिली. परंतु दीनदयाळांच्या मनात काही दुसरेच विचार गर्दी करत होते. १९४० चा काळ होता, दुसरे महायुद्ध सुरु झाले होते, भारतीय स्वातंत्र्य कुठेही नजरेत येत नव्हते. परंतु दीनदयाळांच्या कानात मात्र भारतमातेची आर्त साद घुमत होती. आपण आपल्या देशासाठी काही तरी केले पाहिजे अशी उत्कट इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कुठल्याही प्रकारच्या नोकरीत आपले मन रमणार नाही हे त्यांनी ओळखले. महाविद्यालयीन काळातच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी परिचय झाला होता. संघ संस्थापक पूज्य डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव त्यांच्या मनावर होता. संघटना, संस्कृती, नेतृत्व आणि ज्या ध्येयासाठी, स्वप्नासाठी जीव ओवाळून टाकावा असं भारतमातेच्या उज्वल भविष्याचं स्वप्न ही चतुःसूत्री डॉ. हेडगेवारांच्या विचारांचा पाया होती आणि त्या चतुःसूत्रीने प्रभावित होऊन  पं. दीनदयाळांनी निश्चय केला, ”बास, ठरलं, आपलं सगळं आयुष्य देशहितासाठी, देशकार्यासाठी वाहून घायचं!”
      आपले सगळ्यांचे आवडते राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम म्हणत असत नं, की जे आपण झोपेत बघतो ते खरं स्वप्न नव्हेच. खरं स्वप्न ते असतं जे आपण जागेपणी बघतो आणि ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत आपल्याला नीट झोपही येत नाही  !  पं. दीनदयाळांची  स्थिती अशीच झाली होती. आणि भरपूर पगाराच्या नोकरीकडे पाठ फिरवून, घरच्यांची संमती घेऊन  त्यांनी जन्मभर अविवाहित राहून पूर्णवेळ संघ प्रचारक होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःसाठी निवडलेलं क्षेत्र  होतं समाजकारण. समाजातील तळागाळातील लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी समरस होऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याचं, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या समस्यांचे निराकरण करण्याचं. समस्या जटील आणि सर्वव्यापी व खोलवर रुजलेली होती. त्याकाळचा भारतीय समाज म्हणजे अठराविश्व दारिद्र्य, शोषण, असमानता, भेदाभेद, शिक्षणाचा लवलेशही नाही अशा परिस्थितीत होता. अशा समाजाच्या उत्थानासाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि संघ प्रचारक म्हणून उत्तर प्रदेशात काम करण्यास सुरुवात केली.
     नियतीच्या मनात मात्र काही वेगळाच विचार होता. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतरच्या २-३ वर्षांत, सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने आणि ज्या विचारसरणीनुसार काम करण्यास सुरुवात केली त्यामुळे काँग्रेसमधील काही जुने, निष्ठावान, धडाडीचे नेते अस्वस्थ होऊ लागले. फाळणीनंतर आणि काश्मीर प्रश्नाविषयी पंतप्रधान नेहरू आणि काही जाणत्या नेत्यांमध्ये विसंवाद होऊ लागला. काँग्रेसचे पाकिस्तान बाबतचे बोटचेपी धोरण, काश्मीर विषयक धोरण, अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे धोरण त्यांना देशविघातक वाटत होते. फाळणीच्या जखमा अजून ओल्या होत्या. अशावेळी असे बोटचेपे धोरण देशाला मारक ठरेल,  समाज एकसंध करण्यात बाधा आणेल, असे या नेत्यांना वाटत होते. अशा नेत्यांपैकी एक होते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी. नेहरूंच्या, काँग्रेसच्या अशा धोरणामुळे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी १९५० साली काँग्रेसचा राजीनामा दिला. ते  काँग्रेसमधून बाहेर पडले आणि देशपातळीवर काँग्रेसला एक सक्षम पर्याय देणारा नवा राजकीय पक्ष स्थापण्याचे त्यांनी ठरविले. भारतीय संस्कृती, भारतीय समाजाची धारणा आणि मूल्ये यावर आधारित राजकीय पक्षच संपन्न, समर्थ भारत घडवू शकेल, असा त्यांचा ठाम विश्वास होता. पं. नेहरूंवर पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव होता हे आपण आता जाणतोच. तसेच  रशियन विचारसरणी किंवा फेबियन समाजवाद, भांडवलशाही याचं एक विचित्र मिश्रण त्यांच्या विचारसरणीत होतं. अशी विचारसरणी जीची नाळ इथल्या मातीशी जुळली नव्हती. आणि म्हणून भारतीय समाजमनाला  पचेल, रुचेल आणि भारतीय संस्कृतीच्या भरभक्कम पायावर आधारित असा नवा राजकीय पक्ष त्यांनी स्थापला. आणि संघ संचालक गुरुजींच्या सूचनेनुसार दीनदयाळांनी संघप्रचारकाचे  कार्य थांबवून, किंवा सोडून देऊन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना या कार्यात मदत करण्यासाठी राजकारणात प्रवेश केला. अशा तऱ्हेने डॉ. मुखर्जी आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी काही इतर धुरिणांच्या साहाय्याने २१ ऑक्टोबर १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना केली. डॉ. मुखर्जी पक्षाचे अध्यक्ष होते आणि पं. दीनदयाळ जनरल सेक्रेटरी .
       पुढे लवकरच म्हणजे १९५३ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीं चा मृत्यू झाला आणि या नव्याने स्थापन झालेल्या पक्षासाठी  एक संघटना, विचारसरणी, कार्यक्रम आणि कार्यकर्ते निर्माण करण्याची जबाबदारी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर आली आणि ती त्यांनी किती समर्थपणे पेलली हे, आज छोट्या लवलवत्या पणतीचं एका तेजोमय लोहगोलात झालेलं रूपांतर, एका छोट्याशा रोपट्याचं एका वटवृक्षात झालेलं रूपांतर भारतीय जनता पक्षाच्या रूपाने आपल्या सगळ्यांसमोर आहे. पं. दीनदयाळांनी  रचलेल्या भरभक्कम पायावरच आजचा भारतीय जनता पक्षाचा भव्य डोलारा उभा आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
       १९५३ ते १९६८ या त्यांना लाभलेल्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी राजकीय पक्षाची राजनीती, अर्थनीती व समाजनिती कशी असावी यासाठी मार्गदर्शक सूत्रे तयार केली. त्यांच्या लिखाणातून आणि केलेल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी वेळोवेळी लोकांपुढे मांडली.
आपल्या पक्षासाठी त्यांनी विकसित केलेल्या त्रिसूत्रीचा – एकात्म मानव दर्शन,चित्ती आणि विराट या तीन संकल्पनांचा पाया भारतीय संस्कृतीत होता. त्यांच्या मते भारतीय राष्ट्रवादाचं लक्षण म्हणजे देशाची सांस्कृतिक एकात्मता . पाश्चिमात्य विचारवंतांची राष्ट्रवादाची संकल्पना ज्या घटकां शी निगडित होती ते  म्हणजे १) सलग भूप्रदेश २) एक भाषा ३) एक धर्म ४) एक वंश ५) एक इतिहास. दीनदयाळांच्या मते भारतीय राष्ट्रवादाचं मूळ आणि त्याची शक्ती ही सांस्कृतिक एकात्मतेत आहे. त्यामुळेच अनेक भाषा, विविध धर्म, वेगवेगळ्या अंमलाखाली खंडित झालेला भूप्रदेश आणि त्यामुळे विविध अंमलाखाली विभागली गेलेली जनता जर कुठल्या एका धाग्याने बांधली गेली असेल तर ती म्हणजे हजारो वर्षांची सनातन संस्कृती. या सांस्कृतिक एकात्मतेमुळेच अनेक परकीय आक्रमणं, पराभव आणि त्यातून निर्माण झालेली सुमारे १ हजार वर्षांची पारतंत्रता सोसून देखील जेव्हा संधी मिळाली तेव्हा ‘भारतीय’ म्हणून एकत्र येऊन एकत्रित उत्थानाचे स्वप्न हा देश पाहू शकतो.        हे मूल्य, ही भावना ज्या विवेकातून जन्मते ती चित्ती, – सामूहिक विवेक बुद्धी.चराचर जर विविधतेने नटलेले आहे आणि आपणही त्या चराचराचा एक घटक आहोत तर विविधता/ वैविध्य नाकारायचे का? ते स्वीकारायचे म्हणूनच एक भाषा, एक धर्म हा आग्रह फोल ठरतो. या विचारसरणीतून जे मूल्य निर्माण होतं  ते म्हणजे ‘सहिष्णुता’. हे मूल्य नैसर्गिकपणे स्वीकारणं ही चित्ती. सहिष्णुता म्हणजे भिन्नतेचा, वैविध्यतेचा स्वीकार हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. दीनदयाळांच्या मते सततची परचक्रं, आक्रमणं आणि हजारवर्षांची गुलामगिरी यातून संस्कृती मध्ये विकृती निर्माण होऊ शकते. तशी ती आपल्या संस्कृतीमध्ये ही झाली. उदाहरणार्थ म्हणजे अस्पृश्यता ! ‘रोटीबंदी’ ‘बेटीबंदी’ तत्वांवर आधारलेली जाती-जातीतील आचारसंहिता. परंतु ज्याप्रमाणे आपल्या शरीराचा एखादा अवयव सडला, तर उरलेलं शरीर वाचविण्यासाठी तो अवयव कापून टाकावा लागतो. त्याप्रमाणे संस्कृतीमध्ये आलेली ही विकृतीही  मुळापासून उपटून काढून टाकली पाहिजे. यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे ‘विराट’. दीनदयाळांच्या मते भारतीय समाजातील ‘विराट’ जागवून, पुन्हा सचेतन करून देशाचा विकास करण्याचे काम राजकीय पक्ष करू शकतात. आणि त्यांनी भारतीय जनसंघाची राजकीय विचारसरणी  याच अनुषंगाने तयार केली. २२  ते २५ एप्रिल १९६५ ला मुंबईत केलेल्या  त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून ही त्रिसूत्री त्यांनी स्पष्ट केली. भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन आणि भारतीय अस्मिता निर्माण झाल्याशिवाय भारत एक समर्थ राष्ट्र होऊ शकणार नाही. त्यांनी पक्षासाठी विकसित केलेल्या राजनीती, अर्थनीती आणि समाजनीतीचा पाय देखील हाच होता. त्यांच्या मते राजकारणाचं उद्दिष्ट सत्ता संपादन नसून देशामध्ये उचित आर्थिक व सामाजिक बदल आणि सुधारणा  शांततापूर्ण मार्गाने घडवून आणणे हे आहे. त्यांची समाजाप्रती असलेली आत्मीयता, व्यक्ती आणि समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची आंतरिक ओढ इथे दिसून येते. त्यांचा मूळ पिंड समाजधुरीणाचा. पण नियतीने राजकारणात ढकलल्यावर सुद्धा हे सामाजिक तत्त्वचिंतनच त्यांच्या राजकीय विचारसरणीचा पाया ठरले.
   राजकीय नेता म्हणून त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाची घटना म्हणजे त्यांनी सुरु केलेले आणि यशस्वीरीत्या पूर्ण केलेले / हाताळलेले कच्छ करार विरोधी आंदोलन.
लढाई जिंकून तह हारण्याची भारतीयांची परंपरा तशी जुनीच म्हणायची. इतिहासात त्याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात. तशीच एक घटना म्हणजे १९६५ च्या पाकिस्तानने सुरु केलेल्या युद्धात, पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये झालेला करार.  भारताच्या पश्चिम सीमेजवळ कच्छ मध्ये सुमारे ३५०० चौरस मैल इतक्या मोठ्या प्रदेशावर मिलिटरी पॅट्रोलिंग, गस्त घालण्याची पाकिस्तानला दिलेली परवानगी हा प्रदेश युद्धाआधी आणि युद्धानंतरही भारताच्या ताब्यात होता. परंतु सुरुवातीला आपले सैन्य तिथे तैनात केलेले नव्हते. या संधीचा फायदा घेऊन पाकिस्तानने त्या भागात काश्मीर धर्तीवर घुसखोरी करून मिलिटरी पोस्ट उभारले आणि मिलिटरी पॅट्रोलिंग  सुरु केले. भारतीय सैन्याच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी तिथे आपले सैन्य तैनात केले. तोपर्यंत काश्मीर फ्रंट वर पाकिस्तानने युद्ध छेडले आणि भारत-पाक युद्धाला तोंड फुटले. जेव्हा पाकिस्तानची डाळ शिजेना तेव्हा त्यांनी  युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला. युद्ध एकंदर ३ फ्रंट वर सुरु होते. त्यापैकी दोन फ्रंटसवर भारताने निर्विवाद विजय प्राप्त केला. परंतु छांब सेक्टरमध्ये आपल्याला अजून निर्विवाद वर्चस्व मिळवायचे होते. तोपर्यंत शस्त्रसंधी झाली आणि त्या शस्त्रसंधीच्या ठरावाच्या वेळी पाकिस्तानने कच्छ मधील ३५०० चौ. मैलावर आपला अधिकार सांगत तेथे भारतीय सैन्याला पॅट्रोलींग करण्यास मनाई केली. भारत सरकारने हा करार मान्य केला! हाच तो कच्छ करार !
या कराराविरोधात दीनदयाळ उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाने रान उठवलं, जोरदार आंदोलन छेडलं. ते भारतभर पसरलं! विचार करा ज्या काळात सोशल मीडिया, इंटरनेट वगैरे काही नव्हतं. त्या काळात त्यांनी सबंध भारतभर या कराराविरुद्ध जनमन तयार केले आणि जनआंदोलन छेडलं! सर्व विरोधी पक्षांना  एकत्र करण्याची किमया साध्य केली. फक्त कम्युनिस्ट आणि स्वतंत्रता पक्ष या दोनच पक्षांनी या आंदोलनाला पाठींबा दिला नाही. सर्व भारतातून दीनदयाळांच्या नेतृत्वाखाली पार्लमेंट समोर आंदोलक जमा झाले आणि त्यांनी नारा दिला ”कच्छ करार रद्द करा.” त्यांच्या त्यावेळी केलेल्या अत्यंत ओजस्वी भाषणात दीनदयाळ म्हणाले, “लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच, आज आपल्याच सरकारला आपण ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे, की स्वातंत्र्य हा आमचा अधिकार आहे आणि त्याचे रक्षण करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहेआणि तो आम्ही बजावूच !” थोडक्यात काय तर ज्या सरकारला आपल्या सार्वभौमत्वाचं, आपल्या प्रदेशाचं रक्षण करता येत नाही अशा सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
एवढ्या मोठ्या जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, अशी कदाचित सरकारची अटकळ नव्हती. परंतु दीनदयाळांच्या नेतृत्वाने ते घडवून आणलं. सरकारला फेरविचार करावाच लागेल. शेवटी इंग्लंडच्या मध्यस्थीने भारत पाक करार होऊन  फक्त १० टक्के  प्रदेशावर  पाकिस्तानला समाधान मानावं लागलं.एका अर्थी कच्छ चा भाग भारताकडे अबाधित राहिला ही दीनदयाळांची आधुनिक भारताला भेट आहे. नाहीतर ज्याप्रमाणे भारताच्या नकाशामध्ये शीर्षस्थानचा काश्मीरचा भाग आज पीओके होऊन बसला आहे. त्यानुसार कच्छ सुद्धा एक दुसरा पीओके झाला असता !
अशा या समाजधुरीण, राजकीय नेत्याची १७५ वी  जयंती २५ सप्टेंबर २०२१ रोजी आहे. त्यानिमित्ताने त्यांना त्रिवार वंदन !

– सुनीती नागपूरकर

(लेखिका मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत)

Back to top button