‘महाराजा’ची फिनिक्स भरारी
कर्जाच्या खाईत बुडालेल्या सरकारी मालकीची एअरलाईन्स कंपनी एअर इंडियाला विकत घेण्यासाठी टाटा समूहाच्या वतीने सर्वाधिक बोली लावण्यात आली आणि 67 वर्षांनंतर, जहांगीर रतनजी दादाभाई टाटा अर्थात जेआरडी टाटा यांनी 1932 साली स्थापन केलेल्या एअर इंडियाची मालकी परत मिळवली आहे. यामुळे भारताची शान असलेला (एअर) इंडियाचा ‘महाराजा’ पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेऊन गेलेले वैभव परत आणेल, हा विश्वास निर्माण झाला आहे,
कोणे एकेकाळी सुवर्णक्षण अनुभवणाऱ्या एअर इंडियावर आज घडीला कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा भार आहे. असे असतानाही एअर इंडियाला कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्याचे आव्हान टाटा समूहाने स्वीकारल्याने टाटा समूहाची ही एक दिमाखदार कामगिरी मानली गेली आहे. तब्बल 127 विमाने ताब्यात असलेल्या एअर इंडियाच्या 42 आंतरराष्ट्रीय सेवा आहेत. या सगळ्याची मालकी आता टाटा समूहाकडे येणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा एअर इंडियाला सुगीचे दिवस येतील, ही आशा पल्लवीत झाली आहे.
टाटा सन्सचे अध्वर्यू असलेल्या जेआरडी टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्सची स्थापना केली होती. ते स्वतः देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. 1932 रोजी कराचीहून मुंबईला या कंपनीच्या विमानाचे पहिले उड्डाण झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या. त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर टाटा एअरलाइन्सचे नाव बदलण्यात आले. स्वातंत्र्यानंतर 1953 मध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना याचे पूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्यावेळी जेआरडीनी विरोध दर्शवला होता. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी एअर इंडिया आणि देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी इंडियन एअरलाईन्स अशा दोन स्वतंत्र कंपन्या सरकारने सुरु केल्या.
बँकॉक, टोकियो, न्यूयॉर्क, सिंगापूरसारख्या मार्गांवर सेवा देणाऱ्या एअर इंडियाची कामगिरी मागील काही वर्षांपर्यंत चांगली होती. एअर इंडियाच्या ताफ्यात सुरुवातीला अनेक अत्याधुनिक विमाने होती. तो काळ एअर इंडियाचा भरभराटीचा होता. एअर इंडियाच्या तुलनेत इंडियन एअरलाईन्स लवकर अडचणीत आली. सरकारी हवाई कंपनी अडचणीत सापडली असताना, सरकार खासगी कंपन्यांना हवाई क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन देत होते. एअर इंडियाची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी सरकारने खासगी कंपन्यांना प्रोत्साहन देऊन स्पर्धा वाढवली. याचा फटका एअर इंडियाला बसला. ‘एअर इंडिया’ ला स्वस्त तिकीट, उत्तम सेवा सारख्या सुविधांना सामोरे जावे लागेल. आणि संकटकाळी देशाच्या, देशवासियांच्या मदतीला धावून गेलेली एअर इंडिया स्वतःच संकटात सापडली. २०१७ पर्यंत ‘एअर इंडिया’ आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत होती. कॅग कमिटीकडे एअर इंडियाच्या ऑडिटची जबाबदारी सोपवण्यात आली. कॅग कमिटीने सादर केलेल्या अहवालानुसार, कमी उत्पन्न आणि अधिक कर्ज यामुळे एअर इंडिया डबघाईला आली.
विमान उपलब्ध नसणे, उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर न करणे सारख्या कारणांमुळे एअर इंडिया बद्दल नकारात्मक प्रतिक्रिया खूप कमी वेळात पसरत गेल्या. एअर इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळे लोक एअर इंडियाने प्रवास करणे टाळू लागले. कमी प्रवासी असल्याने विमानाचा खर्च भरून काढण्यासाठी एअर इंडिया ला आपले दर वाढवावे लागले. त्यामुळे प्रवासी अजून कमी होत गेले. भ्रष्टाचार आणि ढिसाळ व्यवस्थापन यांचा प्रचंड फटका एअर इंडियाला बसला. सातत्याने घेण्यात आलेले चुकीचे निर्णय आणि अतिशय वाईट व्यवस्थापन यामुळे एअर इंडिया संकटात सापडली. त्यामुळे एअर इंडिया विकायची किंवा बंद करायची, इतकेच पर्याय सरकारसमोर उरले. एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत केले. 2018 मध्ये एअर इंडियामधील 76 टक्के वाटा विकण्याचा प्रयत्न केला. पण कर्जाचा भार अधिक येणार असल्यामुळे कोणीही एअर इंडिया विकत घेण्यात रस दाखवला नाही. 2019 च्या अखेरीस सरकारने एअर इंडियामधील 100 एक्के हिस्सा विकायचे ठरविले.
सातत्याने तोट्यात असलेली आणि कर्जाच्या ओझ्याने वाकलेल्या ‘एअर इंडिया’ च्या सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे 15 हजार 300 कोटींच्या कर्जासह ‘टाटा सन्स’ने नुकतीच 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली. आणि ‘एअर इंडिया’ चे सर्व मालकी हक्क स्वतःकडे राखून ठेवले. प्रक्रियेनुसार चार महिन्यानंतर ही कंपनी ‘टाटा सन्स’कडे हस्तांतरित होईल. पहिल्या वर्षी सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवले जाईल आणि दुसऱ्या वर्षापासून स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू होईल. आताच्या व्यवहारामुळे ‘महाराजा’ची (एअर इंडिया) शान आता पुन्हा वाढणार आहे. टाटा समूहाचा सध्या ‘एअर एशिया’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्यांत मोठा वाटा आहे. आता ही तिसरी कंपनी त्यांच्याकडे आली आहे.
रतन टाटा यांनी एक जुना फोटो शेअर करत ‘वेलकम बॅक एअर इंडिया’ असे ट्वीट केले आहे. या ट्विट मध्ये रतन टाटांनी म्हटले आहे की, “जेआरडी टाटांनी स्थापन केलेली ही विमान कंपनी एकेकाळी जगातल्या प्रतिष्ठीत विमान कंपन्यांपैकी एक होती. आताही तीच प्रतिष्ठा परत मिळवून देण्याचा टाटा समूहाचा प्रयत्न असेल.” टाटा आपल्या शब्दांना नेहमी जागतात. त्यामुळे त्यांचे हे शब्दही तंतोतंत खरे ठरतील, यात शंका नाही.
सदैव स्मरणात असलेला एअर इंडियाचा लांबलचक झुबकेदार मिशीवाल्या महाराजाशिवाय आज इतक्या वर्षांनंतरही एअर इंडियाची कल्पना केली जाऊ शकत नाही. या महाराजाची कल्पना 1955 मध्ये जन्माला आली. त्याच्या या सिम्बॉलनानंतर एअर इंडियाचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रस्थ चांगलेच वाढले. जगभरातून या सिम्बॉलच्या कल्पकतेचे कौतुक करण्यात आले. टाटा उद्योग समूह आपल्या भारताची शान असलेल्या ‘महाराजा’ची योग्य ती काळजी घेतील याबद्दल प्रत्येक भारतीयाला खात्री आहे.
कोणतीही वस्तू किंवा सेवा लोकांना देताना त्यामध्ये प्रामाणिकपणाचा भाव असावा, ही शिकवण टाटा यांनी आपल्या कामातून नेहमीच आपल्याला दिली आहे. भारतावर आलेल्या प्रत्येक नैसर्गिक संकटाच्या वेळी मदतीचा हात घेऊन उभे असलेल्या रतन टाटांच्या नेतृत्वात हवाई सेवा ही उत्तम प्रकारे मिळेल, असा दृढविश्वास आहे.