सिनेसृष्टीसाठी दिला जाणारा सर्वोच्च ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ रजनीकांतना प्रदान
नवी दिल्ली, दि. २६ : सुपरस्टार रजनीकांत यांची 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. केंद्राकडून दिला जाणारा हा प्रतिष्ठीत पुरस्कार रजनीकांत यांना सोमवारी उपराष्ट्रपती व्यकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार सिनेसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा चित्रपटातील सर्वोच्च सन्मान आहे. दरम्यान, रजनीकांत हे 12 वे दाक्षिणात्य कलाकार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी डॉ.राजकुमार, अक्किनेनी नागेश्वरा राव, के. बालाचंदर या ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
2018 चा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला होता. अमिताभ आणि रजनीकांत यांनी 1991 च्या अॅक्शन-ड्रामा ‘हम’ मध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली होती. रजनीकांत यांना यापूर्वी भारतीय प्रजासत्ताकाचा दुसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण देखील मिळाला आहे. त्यांनी बॉलीवूड तसेच दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. रजनीकांत यांनी 1975 मध्ये के बालचंदरच्या ‘अपूर्व रागांगल’ चित्रपटामधून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते आणि तमिळ चित्रपट उद्योगात 45 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण केली आहेत.
रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगलुळूमधील एका मराठी कुटुंबात झाला होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर टॉलीवूडमध्ये विशेष स्थान मिळवले. आपल्या खास स्टाइल आणि अंदाजामुळे त्यांनी बॉलीवूडमध्येही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. दक्षिण भारतात चाहते रजनीकांत यांना देवाच्या स्थानी मानतात.
रजनीकांत यांना त्यांच्या ‘बिल्ला’ या सिनेमाने खरी ओळख दिली. त्यांचा हा सिनेमा प्रचंड गाजला. याच सिनेमवरुन नंतर बॉलिवूडमध्ये ‘डॉन’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. आजवर त्यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रजनीकांत यांची प्रत्येक भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते.
रजनीकांत यांनी आजवर वेगवेगळ्या पठडीतील भूमिका साकारल्या आहेत. बिनधास्त, धडाकेबाज तसेच कधी रोमॅण्टिक तर कधी विनोदी अशा सर्व प्रकारच्या अभिनयातून त्यांनी दाक्षिण्यात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही त्यांची ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये ‘अंधा कानून’ सिनेमातून त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत चाहत्यांची पसंती मिळवली. तर त्यानंतर हम, रा,वन, अगाज, रोबोट, शिवाजी द बिग बॉ़स अशा अनेक हिंदी सिनेमातून काम केले होते.