News

दुःखाचे दर्शन अण्णाभाऊंमध्ये करुणा उत्पन्न करून गेले – डॉ. मोहन भागवत

अण्णाभाऊंचा पुरेसा परिचय महाराष्ट्रातसुद्धा नाही, याविषयी व्यक्त केली खंत 

मुंबई, दि. १० डिसेंबर : “अण्णाभाऊंनी अथक परिश्रम घेतले, त्यांच्यासारखे जीवन जर एखाद्याला मिळाले, तर तो काही समाजाचा कार्यकर्ता होईल, अशी शक्यता दिसत नाही, त्यांनी केलेले कार्य कठीण आहे,  त्यांची परंपरा ही हलाहल पिऊन लोकांमध्ये शांती उत्पन्न करणाऱ्या शंकराची आहे.अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, कवने समाजाला माहित असतात, परंतु तरीही, अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा आज जितका परिचय असायला हवा होता, तितका महाराष्ट्रातसुद्धा नाही.”, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ‘सा. विवेक’च्या ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवार, दि. १० डिसेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. मोहन भागवत म्हणाले की, “अण्णाभाऊंचा आजच्या संदर्भातील विचार या प्रकाशनाच्या निमित्ताने पुढे येत आहे. अण्णाभाऊंच्या प्रामाणिकतेचा एक शतांश जरी आजच्या पुढाऱ्यांमध्ये आला, तरी या देशाचे भाग्य आहे त्यापेक्षा शंभर पटींनी देश अधिक प्रकाशित होईल. एक व्यक्ती म्हणून, सामाजिक, जीवनापासून, कौटुंबिक जीवनापर्यंत, फार कमी सुखाचे क्षण त्यांच्या वाट्याला आले असले तरीसुद्धा, ते फार कडवट झाले नाहीत. या सोहळ्याच्या निमित्ताने अण्णाभाऊंच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा मला परिचय झाला.”

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील पोवाडा सादर करून प्रकाशन समारंभाची सुरुवात झाली. याप्रसंगी हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे, तसेच सह संपादक रवींद्र गोळे, ह. भ. प. बाबुराव वारे महाराज, उद्योगपती आनंद कांबळे, निवृत्त अधिकारी तुकाराम साठे आदी मान्यवर उपस्थित होते. अण्णाभाऊंनी वापरलेल्या वस्तूंचे संकलन करणारे कबीरदास, जागतिक दर्जाचे अभ्यासक डॉ. संजय देशपांडे आणि रुग्णसेवक डॉ. मधुकर गायकवाड यांना यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

“विचारांमध्ये फरक असला तरी  स्वा. सावरकर आणि अण्णाभाऊ साठे या समाजासाठीच आपली सर्व प्रतिभा समर्पण करणाऱ्या दोन व्यक्तिमत्वांमध्ये मला फरक दिसत नाही, असे मत डॉ. भागवत यांनी यावेळी व्यक्त केले. “अण्णाभाऊंच्या साहित्यात समाजातील संबंधांना तडे जातील असे एकही ठिकाण नाही, सत्य, करुणा, शुचिता, तपस्या हे गुण असल्यामुळे अण्णाभाऊ हे धार्मिक मनुष्य होते, असे मी मानतो, अण्णाभाऊंना आपल्या लोकांच्या उद्धाराची अनिवार्य ओढ होती; परंतु हा आपलेपणा एकाच गटासाठी नव्हता. त्यांचे लेखन भारतीय संस्कृतीच्या मूल्यातत्त्वांचा परिपोष करणारे होते. या देशाचा राष्ट्रीय विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता कंटकाकीर्ण मार्गावरचा दीपस्तंभ म्हणून अण्णाभाउंचे स्थान हे अढळ आहे, आणि ते त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवलेले होते.” असेही त्यांनी सांगितले. याबरोबरच डॉ. भागवत यांनी नमूद केले की, “प्रामाणिकता, वंचितांप्रती कळवळा, समाजाचे मंगल करण्याची इच्छा, आदी गोष्टी अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसून येतात. अण्णाभाऊंनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपल्या प्रतिभेचा चौफेर आविष्कार केला.”

रवींद्र गोळे यांनी ग्रंथ संपादित केला तसेच, सा. विवेकने सहकार्य केले, अशी माहिती तुकाराम साठे यांनी प्रास्ताविक सादर करताना दिली व आयोजक असलेले एम. जी. डी. मिशनचे उद्दिष्ट आणि कार्य सांगितले. 

सर्व समाजपुरुष आमचे आहेत, या भूमिकेतून सा. विवेकने ग्रंथप्रकाशन केले, अण्णाभाऊंच्या जीवनापेक्षा त्यांच्या साहित्यावर या पुस्तकामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे, असे प्रतिपादन रवींद्र गोळे यांनी केले. आनंद कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.

Back to top button