पुस्तक घेण्याचा मोह फार कधीही आवरता घेता येत नाही. घरात बऱ्यापैकी पुस्तके आहेत. त्यात सातत्याने त्यात नविन काही भर पडावी असंच वाटत रहाते. सुदैवाने आजूबाजूला अशी काही माणसे आहेत की ती सातत्याने नविन पुस्तके आणि वाचलेली सांगणारी आहेत. पुस्तके चाळत असताना अनेक गोष्टी मनात डोकावून जातात. खूप वेळ पुस्तके चाळणे, पहाणे आणि निवडणे हे प्रकरण तसं पाहिलं तर माझ्यासाठी अधिक आनंद देणारे आहे.
माझी असलेली स्वतःची छोटी लायब्ररी. लायब्ररी म्हणून तिचे वय आता जवळपास २० वर्षाचे झाले आहेत. प्रत्येक पुस्तकाची आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या प्रसंगाची एक स्वतंत्र आठवण आहे. आयुष्याच्या एकेका वळणावर आणि टप्प्यावर ही पुस्तके भेटत गेली आणि माझ्या संग्रही येत गेली. माझे वडील माझ्या सगळ्या पुस्तकांची नीट काळजी घ्यायचे. त्यांची मांडणी, स्वच्छता, रचना असं सगळं ते माझ्यासाठी नीट करायचे. लग्न झाल्यावर मला एकदा गंमतीने म्हटले होते हल्ली तुझं लक्ष फारसे तुझ्या पुस्तकाकडे नसतं.
वाचायला खरं शिकवलं ते सकाळ वर्तमानपत्राने. रविवारची पुरवणी हा शाळेत असताना अगदी जिव्हाळ्याचा विषय. माध्यमिक शिक्षणातील पाचवी ते दहावी ही वर्षे पुरवणी प्रत्येक रविवारची अनेक वर्षे जपून ठेवली होती. आमच्या शाळेची लायब्ररीने कळतनकळत इतकं वाढलं आमचं पोट कसं भरत होतं तेही लक्षात यायचं नाही. मास्टर फेणे आमचा हिरो होता. वयाच्या खूप सुरुवातीला रशियन साहित्य जे मराठीत भाषांतर झालेलं असं माझ्या हातात गोष्टी स्वरुपात पडले. मॅक्झिम गॉर्कीची आई कादंबरी मी आठव्या वर्षात असताना वाचली. त्या वेळेस कितपत कळली माहित नाही. नंतर लगेच सावरकरांचे चरित्रही हातात पडले.
कॉलेज आयुष्यात असताना विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात एका छानशा अक्षरात काही चांगल्या पुस्तकांची यादी लावलेली असायची. तेही मनावर कोरलं गेले. सुदैवाने त्यातली अधिकाधिक पुस्तके मला वाचायला मिळाली. विद्यार्थी परिषदेच्या कामात असताना एकदा आजारी पडलो आणि निवास म्हणून कर्वेनगरच्या सृजन कार्यालयात सलग काही दिवस राहता आले. त्या निवांत काळात जे मी वाचू शकलो तसा आनंद पुन्हा फारसा काही मिळाला नाही.
एकेका पुस्तकाचा आणि ग्रंथालयाचा माणसांच्या, समाजाच्या जडणघडणीतला प्रवास आणि त्याचे महत्व आपण सगळे जाणतो आहोत. जनमानसातील ह्याची खोली कमी होत असताना काही चांगल्या गोष्टी आजच्या तंत्रज्ञानामुळे घडत आहेत हे नाकारून चालणार नाही. अनेक चांगले पर्याय पण आता आपल्यासमोर उपलब्ध होत आहेत. तरीही वेग इतका आहे एखादे पूर्ण पुस्तक सलग वाचणे तर आता आव्हान होऊन बसले आहे.
कुणीतरी आपल्या जडणघडणीसाठी आवर्जून वाचायला प्रवृत्त करतात ह्याचं मनाला वाटणारे समाधान खूप मोठे आहे. काही जण तर वर्तमानपत्रात आलेले लेख आवर्जून पाठवतात आणि फोन करून सांगतात. आपापल्या आवडीनिवडीनुसार पुस्तकांची मांडणी सुरु होते. ह्या निवडीला आणि मांडणीला एका निश्चित प्रगल्भ अर्थ मिळवून देण्याची गरज आहे. पुस्तकांचे नाते फक्त कपाटाशी आणि देवाणघेवाण ह्या स्वरुपात नको व्हायला.
अनेकदा पुस्तकांची नाव आठवणे आणि मनातल्या मनात त्यातली कुठली तरी गोष्ट पुन्हा उजळणे हे अगदी दिवा लावण्यासारखे आहे. प्रत्येक लायब्ररीची एक रंगसंगती असते आणि ती समजून घेऊन तिचा उपयोग अधिकधिक लोकांसाठी होण्यासाठी नीट विचार करण्याची गरज मला गेल्या काही वर्षात भासायला लागली आहे. समाजाचे म्हणून अधिक चांगले चित्र निर्माण व्हायचे असेल तर ह्या रंगसंगतीकडे संस्कार, संस्कृती, ज्ञान आणि विचार म्हणून अधिक खोलवर पहायला हवं.
१९९४ – ११९८ ही माझी इंजिनीयरींगची चार वर्षे. एक दोन दिवसाच्या सुट्टीत घरी आलो की माझ्या वाचनाचा नाद फारसा काही सुटायचा नाही. परत जाताना आई म्हणायची जाताना बरोबर शिदोरी घेऊन जात जा. प्रवासात आपल्याबरोबर काही खायला काही असलं की चांगलं असते दोन घास आपण खातो आणि दोन घास आपल्या समोरच्यालाही देता येतात. वडील त्यात भर टाकायचे एक दोन पुस्तकेही असू देत बरं असतं.
पुण्यात शनिवारवाड्याजवळ जुनी पुस्तके विकत घेण्यासाठी तासनतास रमत जाणे हे काही आज वेगळंच वाटते. पुस्तक विक्रेते असलेले आजोबा माझ्यासाठी काही पुस्तक काढून ठेवायचे. ते मला कुठल्याही पुस्तकाला हात लावू द्यायचे. गप्पा मारायचे. ही वाचन प्रसाराविषयी असलेली आत्मा. ते दुकान पाहिले तर अगदीच छोटे. एखादा दुसरा माणूस मावेल असे. रस्त्यावर जुनी पुस्तके विकायला बसलेल्या अनेक माणसांची माझी चांगली दोस्ती झाली. मला स्वस्तात पुस्तके हवी होती. मोठ्या दुकानात पहिली एक दोन पाने उघडली की भीती वाटायची. पण त्यातही मजा असायची.
प्रत्येकाचा आपापला वाचनाचा प्रवास असतो आणि तितकाच चित्तथरारक असतो. अगदी महापुरुषांची उदाहरणे घेतली काय आणि आजच्या काळातील आपल्या आजूबाजूची उदाहरणे घेतली तरी त्यात आपल्याला काय काय सापडेल ह्याचा शोध घेणं मजेशीर आहे. लायब्ररीचा मग ती घरातील असो, सार्वजनिक असो किंवा शाळा महाविद्यालयाची असो तिचे म्हणून एक महत्व आहे. हल्ली कधी कधी ते कमी होत चाललंय की काय अशी खंत मनात आहे.
ज्यांनी पुस्तके जोपासली आहेत आणि त्याचं रुपांतर कुठल्या न कुठल्या स्वरुपात कृतीत केलं आहे त्या प्रत्येकाची एक स्वतंत्र गोष्ट आहे आणि ती भारावून टाकणारी आहे. विद्यार्थ्यांच्या वाचनाविषयी समाजाने चिंता करावी अशी आजची आय सी यू मध्ये असल्यासारखी परिस्थिती आहे. खूप तुरळक मुलं मुली हल्ली चांगलं काही वाचताना सापडतात. आपणही त्यांच्यासमोर काय आणि कसं ठेवतो असं मोठे प्रश्नचिन्ह आहे.
आता लिहिणे नित्याचे झाले आहे. त्यावर चर्चा होते. विषय सुचतात. अनेकांचे फोन येतात. मस्त गप्पा होतात. जुन्या आठवणी निघतात. मत मतांतर ह्यातूनही लिहिणे होते. सामाजिक घटना, प्रसंग लिहायला भाग पाडतात. सुदैवाने पुस्तकांची असलेली दोस्ती लिहिताना चांगली उपयोगात आली. वाचनाचा आणि लिहिण्याचा प्रवास हा हातात हात घालून होतो हे छान आहे.
एकदा डोंबिवलीत माझ्या घरी भरपूर पाणी साचले. पावसाचे पाणी गच्चीतून आत शिरले होते. आणि बाहेर जाण्यासाठी पाण्याला काही मार्ग सापडलेला नव्हता. माझ्या सुदैवाने माझी खाली असलेली सगळी पुस्तके भिजण्यापासून वाचली होती. मी नाचत होतो. बायको आणि वडील डोक्याला हात लावून पहात होते. गंमत असते असं नातं जपण्यात.
संजय साळवे